शेष भारताने कोरले इराणी चषकावर नाव; मुकेश कुमार सामनावीर

ईश्वरन आणि श्रीकर भरत यांनी ८१ धावांची नाबाद भागीदारी रचत शेष भारताचा विजय मिळवून दिला
शेष भारताने कोरले इराणी चषकावर नाव; मुकेश कुमार सामनावीर

शेष भारत संघाने सौराष्ट्रवर आठ गडी राखून मात करत २९ व्यांदा इराणी चषकावर नाव कोरले. विजयासाठी मिळालेले १०५ धावांचे लक्ष्य शेष भारताने ३१.२ षटकांत दोन विकेट‌्सच्या मोबदल्यात साध्य केले. पहिल्या डावात २४ धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्स आणि दुसऱ्या डावात ४९ धावांच्या मोबदल्याच एक विकेट घेणाऱ्या मुकेश कुमारला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

उनाडकटने प्रियांक पांचाळ (१८ चेंडूंत २) आणि यश धूल (१० चेंहऊंत ८) यांना लवकर बाद करत शेष भारताला अडचणीत टाकले; मात्र सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने (७८ चेंडूंत नाबाद ६३) झळकविलेल्या अर्धशतकामुळे शेष भारताचा विजय सुकर झाला. त्याला श्रीकर भरतने (८२ चेंडूंत नाबाद २७) शानदार साथ दिली.

ईश्वरन आणि श्रीकर भरत यांनी ८१ धावांची नाबाद भागीदारी रचत शेष भारताचा विजय मिळवून दिला. ईश्वरनने ७८ चेंडूंत नाबाद ६३ धावांची खेळी करताना नऊ चौकार लगावले. भरतने ८२ चेंडूंत नाबाद २७ धावा करताना पाच चौकार लगावले.

सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी ८ बाद ३६८ धावांवरून पुढे खेळणाऱ्या सौराष्ट्रचा दुसरा डाव ३८० धावांत संपुष्टात आला. त्यांना अवघ्या १२ धावांची भर घालता आली. कुलदीप सेनने कर्णधार जयदेव उनाडकट (१३३ चेंडूंत ८९) आणि पार्थ भूत (१६ चेंडूंत ७) यांना बाद करून सौराष्ट्रचा डाव संपुष्टात आणला. कुलदीप सेनने या डावात पाच आणि सामन्यात आठ गडी बाद केले.

सौराष्ट्रला पहिल्या डावात २४. ५ षटकांत ९८ धावांत गारद केल्यानंतर शेष भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३७४ धावा करून २७६ धावांची आघाडी मिळविली होती. मुंबईकर सर्फराज खानचे (१७८ चेंडूंत १३८) योगदान शेष भारतासाठी महत्त्वाचे ठरले. सौराष्ट्रने दुसऱ्या डावात सर्वबाद ३८० धावा करत दमदार पुनरागमन केले; मात्र पहिल्या डावातील हाराकिरीमुळे त्यांची झुंज तोकडी पडली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in