बुमराला विश्रांती; राहुल मात्र परतणार?

बुमरा मालिकेतील तिन्ही सामने खेळला असून त्याने ८१ षटके गोलंदाजी करताना १७ बळी मिळवले आहेत.
बुमराला विश्रांती; राहुल मात्र परतणार?

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे समजते. मात्र अनुभवी फलंदाज के. एल. राहुल या सामन्यासाठी परतण्याची दाट शक्यता आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवण्यात येईल.

बुमरा मालिकेतील तिन्ही सामने खेळला असून त्याने ८१ षटके गोलंदाजी करताना १७ बळी मिळवले आहेत. त्यामुळे कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्क लोड मॅनेजमेंट) अंतगर्त बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अशा स्थितीत मोहम्मद सिराजसह दुसरा वेगवान गोलंदाज कोणता असेल, हे पाहणे रंजक ठरले. सिराजलासुद्धा दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती.

दुसरीकडे, उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीला मुकलेला राहुल जवळपास ९० टक्के तंदुरुस्त झाला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल चौथ्या कसोटीसाठी संघात परतेल. अशा स्थितीत रजत पाटिदारला संघातील स्थान गमवावे लागू शकते. पाटिदारने दोन कसोटींत फक्त ४६ धावा केल्या आहेत. त्यामुळे सर्फराझच्या तुलनेत तोच संघाबाहेर जाईल, असे दिसते.

logo
marathi.freepressjournal.in