पॅरिस : रेल्वेत कार्यरत असलो तरी देशासाठी मी पदक जिंकावे, याकरता पूरेपूर सराव करता यावा, या हेतूने मला भारतीय रेल्वेने ३६५ दिवसांची सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे हे पदक त्या सुट्टीचेच फलित आहे. कुटुंबीयांसह माझ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचा या वाटचालीत अमूल्य वाटा आहे. त्यामुळे आजचे कांस्यपदक मी त्यांच्यासह तमाम भारतीयांना समर्पित करतो, अशा शब्दांत भारताचा कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळेने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
२८ वर्षीय स्वप्निलने गुरुवारी पॅरिसमध्ये तिरंगा फडकावताना भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील तिसरे पदक पटकावले. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात त्याने ही किमया साधली. कोल्हापूरच्या कांबळवाडीतून नेमबाजीची सुरुवात करणाऱ्या स्वप्निलने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवताना देशाचेही नाव उज्ज्वल केले.
“मी २०१२पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी २०२४पर्यंत वाट पाहावी लागली. कदाचित मी या पातळीसाठी मानसिकदृष्ट्या सज्ज नव्हतो. प्रशिक्षक व सहाय्यक चमूने यंदा मला मानसिक पाठिंबा दिला. मला माझ्या प्रयत्नांवर विश्वास होता. कधी ना कधी यश मिळणारच होते. अखेर आज ते साध्य झाले,” असेही स्वप्निल म्हणाला.
दीपाली देशपांडेव्यतिरिक्त महाराष्ट्राचीच माजी नेमबाज तेजस्विनी सावंतसोबत खेळण्याचाही स्वप्निलला लाभ झाला. कोल्हापूरमधून पुणे येथे स्थायिक झाल्यावर तो तेजस्विनीसाेबतच सरावही करायचा. स्वप्निलचे वडील सुरेश हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे, तर त्याची आई अनिता कांबळवाडी येथील सरपंच आहे.
... आणि स्वप्निल नेमबाजीकडे वळला!
-स्वप्निल मूळचा कोल्हापूरजवळील कांबळवाडीचा रहिवासी असून त्याचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक, तर आई गावची सरपंच आहे.
-स्वप्निलने २००८मध्ये सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आणि पुढील वर्षी प्रशिक्षकांच्या सल्ल्याने नेमबाजीत कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. ६ वर्षे तो नाशिक केंद्रात सराव करत होता.
-मध्य रेल्वेत २०१५मध्ये पुणे येथे नोकरी लागल्यावर तो पुण्यात स्थायिक झाला. बालेवाडी स्टेडियममध्ये मग त्याने सरावाला प्रारंभ केला. तेथेच त्याला दिपाली देशपांडे, तेजस्विनी सावंत यांसारख्या नेमबाजांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या काही वर्षांत स्वप्निलने जागतिक तसेच आशियाई स्पर्धेत पदकाची कमाई करून ऑलिम्पिक कोटाही मिळवला. अखेर त्याने ऐतिहासिक पदक जिंकून या श्रमाचे चीज केले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवल्याबद्दल स्वप्निलचे अभिनंदन. नेमबाजीच्या या प्रकारात भारताने प्रथमच पदक पटकावले आहे. स्वप्निल आम्हाला तुझा अभिमान आहे. - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
स्वप्निलची अप्रतिम कामगिरी. ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल तुझे अभिनंदन. प्रत्येक भारतीयाचा तुला अभिमान आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
स्वप्निलच्या १२ वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळाले आहे. स्वप्निलच्या यशामुळे खाशाबा जाधव यांची पुन्हा आठवण झाली. कांबळवाडी ते पॅरिसमध्ये पदकाला गवसणी असा प्रवास करणाऱ्या स्वप्निलमुळे असंख्य जणांना प्रेरणा मिळेल. - एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
एका ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत ३ पदके जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी २०१२मध्ये भारताने नेमबाजीत दोन पदके कमावली होती.