चेंडूवर लाळ लावण्याची पुन्हा परवानगी द्यावी : मोहम्मद शमीच्या मागणीवर माजी खेळाडूंची 'बॅटिंग'

"चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर गेल्या शतकापासून सुरू आहे. १९२० मध्ये जेव्हा महामारी आली तेव्हाही त्यावर बंदी घालण्यात आली नव्हती. कोविड आता संपला आहे. त्यामुळे आता हा नियम संपवण्याची वेळ आली आहे"
चेंडूवर लाळ लावण्याची पुन्हा परवानगी द्यावी : मोहम्मद शमीच्या मागणीवर माजी खेळाडूंची 'बॅटिंग'
Published on

दुबई : आयसीसीने चेंडूवर लाळ लावण्याची पुन्हा परवानगी द्यावी ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना चेंडू रिव्हर्स स्विंग करता येईल, असे स्पष्ट मत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने व्यक्त केले होते. त्याच्या या मताशी अनेक माजी खेळाडूंनी सहमती दर्शवत पाठिंबा दिला आहे.

२०२०मध्ये कोरोनाच्या काळात आयसीसीने खबरदारी बाळगून चेंडूवर लाळ लावण्यास मनाई केली होती. पण, त्यानंतर सप्टेंबर २०२२मध्ये आयसीसीने कायमस्वरूपी हा नियम अंमलात आणला आहे.

याबाबतीत बोलताना, "आता ही बंदी हटवावी. मी शमीला पूर्णपणे पाठिंबा देतो. सर्व नियम फलंदाजांना फायदा देणारे असताना किमान गोलंदाजांसाठीही काहीतरी असायला हवे, असे भारताचा माजी खेळाडू सलील अंकोलाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले. "मी अलिकडेच रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात समालोचन करताना याबद्दल बोलत होतो. चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर गेल्या शतकापासून सुरू आहे. १९२० मध्ये जेव्हा महामारी आली तेव्हाही त्यावर बंदी घालण्यात आली नव्हती. कोविड आता संपला आहे. त्यामुळे आता हा नियम संपवण्याची वेळ आली आहे," असे तो म्हणाला.

वर्नोन फिलँडर आणि टिम साऊथीचाही पाठिंबा

दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज वर्नोन फिलँडर आणि न्यूझीलंडचा टिम साऊथी यांचाही शमीला पाठिंबा मिळाला आहे. गोलंदाजांना पुन्हा एकदा लाळ वापरण्याची परवानगी दिल्यास, सध्या खेळातून जवळपास नष्ट झालेल्या रिव्हर्स स्विंगला पुनर्जन्म मिळेल, (विशेषतः समतल (फ्लॅट) खेळपट्ट्यांवर, जिथे सध्या बहुतांश एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले जातायेत) असे त्यांनी म्हटले.

"माझ्या मते, एक गोलंदाज म्हणून तुम्हाला थोडा तरी फायदा असावा. खेळ ज्या दिशेने जातोय, त्यामध्ये संघ ३६२ धावा (न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीत केलेला स्कोअर) किंवा अनेकदा ३०० हून अधिक धावा सहज करतो. त्यामुळे गोलंदाजांच्या बाजूने काहीतरी असायला हवे, आणि त्यासाठी थोडीशी लाळ वापरण्याची परवानगी द्यायला काय हरकत आहे? हा नियम परत आणण्यात काही अडचण नसावी असे मला वाटते," असे टिम साऊथीने ESPNcricinfo च्या 'मॅच डे' कार्यक्रमात सांगितले.

"जर आपण चेंडूकडे पाहिले, तर शेवटच्या टप्प्यात तो खूप झिजलेला दिसतो. मला वाटते की जर लाळ वापरून चेंडूच्या एका बाजूला चमक आणली, तर रिव्हर्स स्विंगचा प्रभाव खेळात दिसू शकतो. हा नियम किमान एकदिवसीय क्रिकेटमध्ये तरी परत आणण्याची गरज आहे, असे फिलँडर म्हणाला.

सावधगिरीचा सूरही उमटला, वेंकटेश प्रसाद काय म्हणाले?

तथापि, या मुद्द्यावर सावधगिरीचा सूरही उमटला. "माझ्या मते, शमीने अत्यंत योग्य मुद्दा मांडला आहे, पण या निर्णयावर येण्यापूर्वी आपण या विषयाचा अधिक सखोल विचार करायला हवा," असे भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी सांगितले. "चेंडूवर लाळ लावण्यावर घालण्यात आलेली बंदी स्वच्छता राखण्यासाठीही होती. आज कोणतेही संक्रमण कधी आणि कसे पसरेल, हे आपण सांगू शकत नाही. कोणता नवीन विषाणू हवेत प्रवेश करेल, याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे, ही बंदी हटवण्याचा निर्णय घेताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे," असेही प्रसाद यांनी म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in