पाँटिंग पंजाब किंग्ज संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
पाँटिंग पंजाब किंग्ज संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी
BCCI
Published on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ट्रेव्हर बेलिस यांच्या जागी ४९ वर्षीय पाँटिंग पंजाबचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे. पुढील चार वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचे मालकी हक्क असलेल्या पंजाबला अद्याप १७ वर्षांत एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही. २०१४मध्ये त्यांनी फक्त एकदा अंतिम फेरी गाठली होती. गेल्या हंगामातसुद्धा पंजाबला बाद फेरी गाठता आली नाही. त्यामुळे आता बेलिस यांना सोडचिठ्ठी देत जिगरबाज व आक्रमक वृत्तीच्या पाँटिंगकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. पाँटिग गेल्या हंगामापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदी होता. त्याने सात हंगाम दिल्लीला मार्गदर्शन केले. पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीने २०२०मध्ये अंतिम फेरी गाठली.

“ऑस्ट्रेलियाच्या पाँटिंगने चार वर्षांसाठी पंजाब किंग्ज संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले आहे. तसेच पाँटिंगला सहाय्यकांचा चमू निवडण्याचीही मुभा देण्यात आली आहे,” असे पंजाब संघाने पत्रात स्पष्ट केले. पंजाबच्या संघात अर्शदीप सिंग, जितेश शर्मा, शशांक सिंग, आशुतोष शर्मा असे प्रतिभावान भारतीय खेळाडू आहेत. तसेच कॅगिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन हे खेळाडूही त्यांच्याकडे होते. शिखर धवनने निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्याला पंजाब संघात कायम ठे‌वण्याची शक्यता कमी आहे.

logo
marathi.freepressjournal.in