IPL 2024 : पंत यष्टिरक्षणासाठी तंदुरुस्त; पण मोहम्मद शमीसह 'हा' वेगवान गोलंदाजही स्पर्धेला मुकणार

पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्यासह यष्टिरक्षकाची भूमिकाही बजावणार का, हे पाहणे रंजक ठरणार...
IPL 2024 : पंत यष्टिरक्षणासाठी तंदुरुस्त; पण मोहम्मद शमीसह 'हा' वेगवान गोलंदाजही स्पर्धेला मुकणार
Published on

नवी दिल्ली : भारताचा २६ वर्षीय डावखुरा फलंदाज आगामी आयपीएलमध्ये फलंदाजीसह यष्टिरक्षणही करू शकतो, असे बीसीसीआयने वैद्यकीय पथकाचा हवाला देत मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्यासह यष्टिरक्षकाची भूमिकाही बजावणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

डिसेंबर २०२२मध्ये पंतचा अपघात झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. मात्र बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली पंतने १४ महिने तंदुरुस्तीवर मेहनत घेतली. पंत आता आयपीएलद्वारे स्पर्धात्मक क्रिकेटकडे वळणार आहे. फलंदाजी करण्यास तो पूर्णपणे तयार आहे. मात्र तो यष्टिरक्षण करू शकेल की नाही, याबाबत साशंका होती. अखेर बीसीसीआयने मंगळवारी याविषयी माहिती देत पंत यष्टिरक्षणासाठीही तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारीच पंतने आयपीएलमध्ये यष्टिरक्षणासह फलंदाजीत छाप पाडली, तर टी-२० विश्वचषकासाठी त्याचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो, असे जाहीर केले होते.

२२ मार्चपासून आयपीएल सुरू होईल. त्यानंतर १ जूनपासून टी-२० विश्वचषक रंगणार आहे. दरम्यान, मोहम्मद शमी व प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाज आगामी आयपीएलला मुकणार असल्याचेसुद्धा बीसीसीआयने निवेदनात नमूद केले आहे. कृष्णाच्या डाव्या मांडीवर, तर शमीच्या उजव्या पायावर फेब्रुवारीत शस्त्रक्रिया करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in