नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फलंदाज ऋषभ पंत उजव्या पायाच्या दुखापतीमुळे आगमी आशिया चषकाला मुकण्याची शक्यता बळावली आहे. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो वेळेत तंदुरुस्त होईल की नाही, याबाबतही संभ्रम आहे.
२७ वर्षीय पंतला इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना उजव्या पायाला चेंडू लागल्याने दुखापत झाली. पंतच्या पायातून रक्त येत होते. तसेच पायाला सूजही आली होती. मात्र तरीही तो फलंदाजीस आला होता. पंतने अर्धशतक झळकावून सर्वांची मने जिंकली. तसेच स्वत:चे शौर्यही दाखवले. मग पाचव्या कसोटीला पंत मुकला. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले.
आता ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाचा एकही सामना नाही. मात्र पंतला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी किमान सहा आठवड्यांचा अवधी लागू शकतो. अशा स्थितीत ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये रंगणाऱ्या आशिया चषकाला पंत मुकण्याची शक्यता आहे. तसेच २ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. तोपर्यंत पंत तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे.
“पंतची दुखापत गंभीर आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज नसली, तर फ्रॅक्चर झाल्याने किमान ५ ते ६ आठवडे तो पूर्णपणे तंदुरुस्त होणार नाही. त्यामुळे आशिया चषकात पंत खेळण्याची शक्यता कमी आहे. संजू सॅमसन भारताच्या पहिला पसंतीचा यष्टिरक्षक असण्याची शक्यता असून के. एल. राहुल किंवा जितेश शर्मा यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते,” असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
९ ते २८ सप्टेंबर या काळात आशिया चषक रंगणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत.
दरम्यान, भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. आयसीसीने २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.
गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत मग भारताने दुसऱ्या डावात तब्बल पाच सत्र फलंदाजी करून लढत अनिर्णित राखली. २०२१-२२च्या मालिकेतसुद्धा भारताला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी भारताने पिछाडीवरून मालिकेत बरोबरी साधली. भारताने २००७मध्ये यापूर्वी इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती.