

नवी दिल्ली: भारताचा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पायाच्या दुखापतीतून सावरला असून पुनरागमनासाठी सज्ज आहे. मात्र नियमाप्रमाणे त्याला प्रथम देशांतर्गत स्पर्धेत स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका अ-संघाविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांसाठी पंतकडे भारत-अ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
भारत-आफ्रिका यांच्या अ-संघांमध्ये बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मैदानात चार दिवसांचे दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर आणि ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत हे सामने होतील. यापूर्वी ऑस्ट्रेलिया-अ संघांविरुद्ध झालेल्या एकदिवसीय प्रकारात श्रेयस मालिकांमध्ये अय्यरने, तर कसोटी प्रकारात रजत पाटीदारने भारत-अ संघाचे नेतृत्व केले होते.
२७ वर्षीय पंतला जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना उजव्या पायाला चेंडू लागल्याने दुखापत झाली. पंतच्या पायातून रक्त येत होते.
तसेच पायाला सूजही आली होती. मात्र तरीही तो फलंदाजीस आला होता. पंतने अर्धशतक झळकावून सर्वांची मने जिंकली. तसेच स्वतःचे शौर्यही दाखवले. मग पाचव्या कसोटीला पंत मुकला. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले.
त्यानंतर पंत आशिया चषकाला मुकला. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीही तंदुरुस्त होऊ शकला नाही. सध्या भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. हा दौरा नोव्हेंबरमध्ये संपेल. मग १४ नोव्हेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास पंतला भारत-अ संघाकडून छाप पाडावी लागेल.
भारत-अ संघ
पहिल्या लढतीसाठी : ऋषभ पंत (कर्णधार), आयुष म्हात्रे, नारायण जगदीशन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुतार, खलिल अहमद, गुर्नूर ब्रार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बदोनी, सारांश जैन.
दुसऱ्या लढतीसाठी : ऋषभ पंत (कर्णधार), के. एल. राहुल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुतार, खलिल अहमद, गुर्नूर ब्रार, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.