
नवी दिल्ली : एकीकडे मुंबईत रोहित रणजी स्पर्धेत सहभागी होत असताना दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत, शुभमन गिल, रवींद्र जडेजा हे भारतीय खेळाडूही आपापल्या रणजी संघाकडून खेळताना दिसतील.
दिल्लीकडून खेळणारा पंत जडेजाच्या सौराष्ट्र संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. सौराष्ट्रच्या संघात चेतेश्वर पुजाराचाही समावेश आहे. राजकोट येथे हा सामना होईल. पंत, जडेजा यांचा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात समावेश असल्याने ते दुसरी रणजी लढत मात्र खेळतील की नाही, याविषयी साशंका आहे.
तसेच युवा गिल पंजाबसाठी कर्नाटकविरुद्धच्या लढतीत खेळताना दिसेल. बंगळुरूला हा सामना होणार आहे. मुंबईकर वासिम जाफर पंजाब संघाचा प्रशिक्षक आहे. मात्र के. एल. राहुल दुखापतीमुळे कर्नाटककडून खेळू शकणार नाही. त्या स्थितीत मयांक अगरवाल त्यांचे नेतृत्व करेल. विजय हजारे स्पर्धेत छाप पाडल्यानंतर करुण नायर विदर्भाचे पुन्हा प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे. विदर्भाची राजस्थानशी गाठ पडेल. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा महाराष्ट्र संघ बडोद्याशी दोन हात करणार आहे. मोहम्मद सिराजला मात्र बीसीसीआयने विश्रांती घेण्यास सांगितले असल्याने तो हैदराबादच्या संघाचा भाग नाही.
विराटही खेळणार?
विराट कोहली दिल्ली संघाच्या पहिल्या लढतीला मानेच्या दुखापतीमुळे मुकणार असला तरी ३० जानेवारीपासून रेल्वेविरुद्ध रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. दिल्लीकडून २०१२मध्ये अखेरचा रणजी सामना खेळलेल्या विराटच्या रणजीतील पुनरागमनाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.