उगवता तारा! सिन्नरला कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद

सिन्नरने दमदार कामगिरी करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती.
उगवता तारा! सिन्नरला कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद

मेलबर्न : उपांत्य फेरीत जेतेपदाच्या वाटेतील प्रमुख अडसर ठरणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का दिल्यानंतर इटलीच्या यानिक सिन्नरने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचे आव्हान पाच सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत परतवून लावत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रॉड लेव्हर एरिनावर रंगलेल्या अंतिम सामन्यात सिन्नरने पहिले दोन सेट गमावल्यानंतरही जोमाने कमबॅक करत कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली.

२२ वर्षीय सिन्नरने ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असा विजय मिळवत एड्रियानो पनाट्टा याच्यानंतरचा १९७६पासूनचा पहिला ग्रँडस्लॅम विजेता होण्याचा मान पटकावला. तसेच जोकोव्हिचनंतरचा (२००८) तो ऑस्ट्रेलियन ओपनचा सर्वात युवा विजेता ठरला आहे. पहिले दोन्ही सेट जिंकल्यानंतर सलग दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभूत होणारा मेदवेदेव हा पहिला टेनिसपटू ठरला आहे. २०२४च्या अंतिम फेरीतही पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात स्पेनच्या राफेल नदालने त्याला पराभूत केले होते. २०२१मध्ये अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर गेल्या सहापैकी पाच ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत त्याला पराभव पत्करावा लागला आहे.

सिन्नरने दमदार कामगिरी करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याच्या चुकांमुळे मेदवेदेवला पहिला सेट जिंकण्याची संधी मिळाली. मात्र मेदवेदेवने दुसऱ्या सेटमध्ये अप्रतिम खेळ करत दोन वेळा सिन्नरची सर्व्हिस भेदून सामन्यात २-० अशी आघाडी घेतली होती. कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी खेळणाऱ्या सिन्नरने तिसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवला चांगली लढत दिली. ४-४ अशा स्थितीतून मेदवेदेवची सर्व्हिस मोडीत काढत सिन्नरने तिसरा सेट ६-४ असा आपल्या नावावर केला. चौथ्या सेटमध्येही तिसऱ्या सेटचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. त्याने हा सेटसुद्धा ६-४ अशा फरकाने आपल्या नावावर केला. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये मेदवेदेवची जादू चाललीच नाही. सिन्नरच्या वेगवान खेळापुढे तो निष्प्रभ ठरला. सिन्नरने ६-३ असा पाचवा सेट जिंकून पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आपल्या नावावर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in