तिलक कर्णधार, हर्षित परतला; मुंबईच्या सूर्यांश, तनुषला संधी; रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेसाठी भारत-अ संघ जाहीर

भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांची आगामी एसीसी पुरुष रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेसाठी भारत ‘अ’ संघात निवड करण्यात आली आहे.
तिलक कर्णधार, हर्षित परतला; मुंबईच्या सूर्यांश, तनुषला संधी; रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेसाठी भारत-अ संघ जाहीर
तिलक कर्णधार, हर्षित परतला; मुंबईच्या सूर्यांश, तनुषला संधी; रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेसाठी भारत-अ संघ जाहीरसंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांची आगामी एसीसी पुरुष रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेसाठी भारत ‘अ’ संघात निवड करण्यात आली आहे. १९ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कतारमधील दोहा येथे ही एकदिवसीय प्रकारातील स्पर्धा रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.

युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, अनुभवी फलंदाज रजत पाटीदार उपकर्णधार असेल. या स्पर्धेत भारताला पाकिस्तान ‘अ’, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्याशी सामना करावा लागणार आहे. मुख्य म्हणजे वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा या संघात समावेश असल्याने त्याच्या तंदुरुस्तीकडे लक्ष असेल. मुंबईच्या सूर्यांश शेडगे व तनुष कोटियन या अष्टपैलूंनादेखील या संघात स्थान लाभले आहे.

संघात यष्टिरक्षक प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर रिंकू सिंग आणि शाहबाज अहमद यांना संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये विप्रज निगम, हर्ष दुबे आणि तनुष कोटियन यांचा समावेश आहे. वैभव सूर्यवंशीच्या प्रतिभेकडे विशेष लक्ष असेल.

भारतीय संघ

तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, रिंकू सिंग, कुमार कुशाग्र, सूर्यांश शेडगे, शाहबाझ अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शद खान.

न्यूझीलंड-अ संघाला पहिल्या डावात आघाडी

आगामी कसोटी मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. भारत ‘अ’ संघाकडून खेळताना सिराजने दुसऱ्या अनधिकृत कसोटीत ३५ षटकांत चार बळी मिळवले. त्याला मुकेश कुमारने पाच बळी घेत चांगली साथ दिली. मात्र, न्यूझीलंड ‘अ’ संघाच्या तळाच्या फलंदाजांनी केलेल्या झुंजार फलंदाजीमुळे यजमानांनी पहिल्या डावात ७८ धावांची आघाडी मिळवली. भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात ३४६ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंड ‘अ’ संघाची अवस्था एकवेळ ८ बाद ३३८ अशी झाली होती. मात्र, अखेरच्या दोन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत आणखी ८६ धावांची भर घातली. त्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव ४२४ धावांवर संपुष्टात आला.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)