पाटीदार जायबंदी, बदोनीला संधी; रायझिंग स्टार्स आशिया चषकासाठी रिंकू भारताचा उपकर्णधार

दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाज रजत पाटीदारला आगामी रायझिंग स्टार्स आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी आयुष बदोनीचा भारत-अ संघात समावेश करण्यात आला आहे.
पाटीदार जायबंदी, बदोनीला संधी; रायझिंग स्टार्स आशिया चषकासाठी रिंकू भारताचा उपकर्णधार
पाटीदार जायबंदी, बदोनीला संधी; रायझिंग स्टार्स आशिया चषकासाठी रिंकू भारताचा उपकर्णधार
Published on: 

नवी दिल्ली : दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाज रजत पाटीदारला आगामी रायझिंग स्टार्स आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी आयुष बदोनीचा भारत-अ संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच, या आठ संघांच्या स्पर्धेसाठी रिंकू सिंगची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. पाटीदारने आपल्या दुखापतींवर उपचार सुरू असल्याने ५० षटकांच्या क्रिकेट प्रकारासाठी निवडीचा विचार करू नये, असे बीसीसीआयला कळवले आहे. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले. निवड समितीने रिंकू सिंगची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली असून, आयुष बदोनीला पाटीदारच्या जागी संघात स्थान दिले आहे. तिलक वर्मा या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.

रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेचे आयोजन कतारमधील दोहा येथे १९ ते २९ नोव्हेंबरदरम्यान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. अ-गटात बांगलादेश-अ, श्रीलंका-अ, अफगाणिस्तान-अ आणि हाँगकाँग असे चार संघ आहेत, तर ब-गटात भारत-अ, पाकिस्तान-अ, संयुक्त अरब अमिराती-अ आणि नेपाळ-अ या संघांचा समावेश आहे.

भारत-अ संघ आपल्या मोहिमेची सुरुवात २० नोव्हेंबरला नेपाळ-अ संघाविरुद्ध करणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान-अ संघाशी, तर २४ नोव्हेंबरला संयुक्त अरब अमिराती-अ संघाशी सामना होईल. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने २६ आणि २७ नोव्हेंबरला खेळवले जातील. तर स्पर्धेचा अंतिम सामना २९ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता लागून आहे.

भारतीय संघ

तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, रिंकू सिंग (उपकर्णधार), कुमार कुशाग्र, सूर्यांश शेडगे, शाहबाझ अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शद खान, आयुष बदोनी.