रोहन बोपण्णाचा टेनिसला अलविदा

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाने शनिवारी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या चार भारतीय टेनिसपटूंपैकी तो एक आहे. दोन दशकांहून अधिक काळ एटीपी टूरवर खेळणाऱ्या या दिग्गज भारतीय टेनिसपटूच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला आहे.
रोहन बोपण्णाचा टेनिसला अलविदा
रोहन बोपण्णाचा टेनिसला अलविदा
Published on

नवी दिल्ली: भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाने शनिवारी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या चार भारतीय टेनिसपटूंपैकी तो एक आहे. दोन दशकांहून अधिक काळ एटीपी टूरवर खेळणाऱ्या या दिग्गज भारतीय टेनिसपटूच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला आहे.

४५ वर्षीय बोपण्णाने पॅरीस मास्टरमध्ये आपला अखेरचा सामना खेळला. आठवड्याच्या सुरुवातीला कझाकस्तानचा जोडीदार अॅलेक्झांडर बुबलिक सोबत त्याने कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

२००० मध्ये बोपण्णाने टेनिसपटू म्हणून व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात केली. तो भारतातील सर्वात यशस्वी दुहेरी खेळाडूंपैकी एक आहे. मजबूत सर्व्हिस आणि दीर्घ कारकीर्दीसाठी त्याला ओळखले जाते. डेव्हिस कप, ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये बोपण्णाने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

पहिला ग्रँड स्लॅम विजय २०१७च्या फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी स्पर्धेत मिळवला. त्यावेळी त्याने कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोव्स्कीसोबत जोडी जमवत दमदार कामगिरी केली. त्यानंतर त्यांने आपला पहिला आणि एकमेव पुरुष दुहेरी ग्रँड स्लॅम किताब २०२४ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मॅथ्यू एब्डनसोबत जिंकला.

बोपण्णाने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकनंतर भारतासाठीचा आपला कारकिर्दीचा शेवट केला होता. त्याने २०२३ मध्ये डेव्हिस कपमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि लखनऊ येथे मोरोक्कोविरुद्धचा आपला शेवटचा सामना खेळला होता.

गुडबाय... पण हा शेवट नाही. अधिकृतपणे टेनिसला अलविदा करत आहे. ज्या खेळाने आयुष्याला अर्थ दिला त्याला निरोप कसा द्यायचा? २० वर्षानंतर आता निवृत्तीची वेळ आली आहे. माझा प्रवास भारतातील एका छोट्याशा गावातून सुरू झाला. सर्व्हिस मजबूत करण्यासाठी लाकडाचे तुकडे तोडणे, कॉफीच्या मळ्यांमधून धावणे असे कष्ट घेतले, त्यानंतर जगातील मोठ्या कोर्टवर खेळण्याची संधी मिळाली.

रोहन बोपण्णा, टेनिसपटू

तब्बल दोन दशकांहून अधिक कालावधीत या टेनिसपटूने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ४ भारतीय टेनिसपटूंनी ग्रैंड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे. त्यापैकी रोहन बोपण्णा हा एक आहे.

logo
marathi.freepressjournal.in