रोहन बोपण्णा टेनिस प्रीमियर लीगमध्ये खेळणार,सहाव्या पर्वात अव्वल टेनिसपटूंचा सहभाग

टेनिस प्रीमियर लीगचा यंदाचा सहावा हंगाम लवकरच सुरू होणार असून जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित खेळाडू रोहन बोपण्णा या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
रोहन बोपण्णा टेनिस प्रीमियर लीगमध्ये खेळणार,सहाव्या पर्वात अव्वल टेनिसपटूंचा सहभाग
PTI
Published on

मुंबई : टेनिस प्रीमियर लीगचा यंदाचा सहावा हंगाम लवकरच सुरू होणार असून जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित खेळाडू रोहन बोपण्णा या स्पर्धेत सहभागी होणार आहे. डिसेंबरमध्ये ही लीग मुंबईत पार पडणार आहे. बोपण्णा सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे.

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टेनिसपटूंपैकी एक असलेला बोपण्णा प्रथमच टेनिस लीगमध्ये सहभागी होणार आहे. ४४ वर्षीय बोपण्णाने कारकीर्दीत दोन ग्रॅण्डस्लॅम विजेतीपदे (२०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी आणि २०१७ मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी) मिळवली आहेत. तीन ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बंगळुरूचा रहिवासी असलेल्या बोपण्णाने वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविणारा सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून मान मिळविला होता. कारकीर्दीत आतापर्यंत त्याने २५ हून अधिक विजेतीपदे मिळविली आहेत. टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा बोपण्णा हा लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झानंतर चौथा टेनिसपटू आहे. या चारही भारतीय टेनिसपटूंनी कारकीर्दीत एकतरी ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळविले आहे.

जवळपास दोन दशकाहून अधिक काळ एटीपी मालिकेचा भाग असलेला बोपण्णा आणि टेनिस प्रीमियर लीगच्या नव्या शैलीत खेळताना दिसणार आहे. सर्व फ्रँचाईजी उपांत्य फेरीत पात्र होण्यासाठी प्रत्येकी पाच सामने खेळतील. ही लीग २५ गुणांच्या पद्धतीत खेळविली जाणार आहे. प्रत्येक फेरीत पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी अशा सामन्यांचा समावेश असेल. प्रत्येक सामन्यात १००० गुण असतील. प्रत्येक श्रेणीचे मूल्य २५ गुण असेल. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात ५०० गुण गुण कमावता येतील. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

नवीन गुणपद्धत आकर्षक -बोपण्णा

बोपण्णा, सुमित नागल, फ्रान्सचा ह्युगो गॅस्टन, अर्मेनियाचा एलिना अवनेसियान या प्रमुख खेळाडूंसह विजेतेपदासाठी प्रयत्नशील राहील. लीगचे सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) कोर्टवर होणार आहेत. टेनिस प्रीमियर लीगचा एक भाग होताना मला खूप आनंद झाला आहे. मी खूप रोमांचित आहे. विशेषत: लीगच्या नावीन्यपूर्ण २५ गुणाच्या पद्धतीसह ही लीग तरुण खेळाडूंना आकर्षित करेल, असा मला विश्वास वाटतो, असे रोहन बोपण्णाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in