१२ वर्षांनी विश्वचषक उंचावण्याचा रोहितला विश्वास

चाहत्यांचा पाठिंबा ठरणार निर्णायक; आयसीसीच्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर केले भाष्य
१२ वर्षांनी विश्वचषक उंचावण्याचा रोहितला विश्वास

नवी दिल्ली : घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ भारतीय संघाला होईल. स्टेडियममधील हजारो प्रेक्षक तसेच घरातूनही पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांच्या साक्षीने यंदा १२ वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक उंचावण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला. भारताने २०११मध्ये मायदेशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवले होते.

३६ वर्षीय रोहित सध्या अमेरिकेत असून तेथे लवकरच त्याची क्रिकेट अकादमी सुरू होणार आहे. तसेच विश्वचषकाचा झळाळता करंडक सध्या संपूर्ण विश्वाची परिक्रमा करत असून सोमवारी हा चषक अमेरिकेत होता. त्यावेळी आयसीसीने रोहितचा चषकासह फोटो काढून १९ नोव्हेंबरला भारतीय संघ हा चषक उंचावेल का, असा प्रश्न चाहत्यांना विचारला. भारतात ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषकाचा थरार रंगणार असून, भारतीय संघ ८ तारखेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.

“मी विश्वचषकाला प्रथमच इतक्या जवळून पाहत आहे. २०११मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला, त्यावेळी मी भारतीय संघाचा भाग नव्हतो. मात्र या चषकासाठीच क्रिकेटपटू सर्वस्व अर्पून खेळत असतो. माझ्याही या विश्वचषकाशी असंख्य आठवणी जडल्या आहेत. १९ नोव्हेंबर रोजी आम्ही हा विश्वचषक उंचावू, अशी आशा आहे,” असे मुंबईकर रोहित म्हणाला.

“भारतातील प्रत्येक शहरात, स्टेडियममध्ये आम्हाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभेल, याची खात्री आहे. १२ वर्षांनी भारतात एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हा घटक आमच्यासाठी नक्कीच निर्णायक ठरेल. चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला विश्वचषक जिंकण्यासाठी प्रेरणा मिळेल,” असेही रोहितने नमूद केले.

२०११चा विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मी भारतीय संघात निवड झाल्यामुळे एकही सामना न पाहण्याचे ठरवले होते. मात्र दुसरीकडे संघ चांगली कामगिरी करत असल्याने मला सामन्याकडे दुर्लक्ष करणे जमले नाही. मी भारताच्या सर्व लढतींचा प्रत्येक चेंडू पाहिला, अशी कबुलीही रोहितने दिली. त्याशिवाय २०१९च्या विश्वचषकात पाच शतक साकारूनही संघाला अंतिम फेरीत नेण्यात अपयशी ठरल्याची खंत रोहितने बोलून दाखवली.

रोहितने स्वत:च्या कारकीर्दीतील निवडलेले पाच मौल्यवान क्षण

२००७मध्ये टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणे.

सचिन तेंडुलकरसह २००८च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीबी सीरिजमध्ये शतकी भागीदारी रचणे.

कसोटी पदार्पणात शतक झळकावणे. (ईडन गार्डन्स, कोलकाता, २०१३)

श्रीलंकेविरुद्ध २०१४मध्ये एकदिवसीय सामन्यात साकारलेली २६४ धावांची खेळी.

२०२१मध्ये गॅबा येथील कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in