रोहित, जडेजाचा शतकी प्रहार! सर्फराझचे पदार्पणात अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर भारताची दमदार सुरुवात

सर्फराझने सुरुवातीपासूनच आक्रमक रूप धारण केले. त्याने प्रत्येक षटकात किमान एक चौकार वसूल केले.
रोहित, जडेजाचा शतकी प्रहार! सर्फराझचे पदार्पणात अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर भारताची दमदार सुरुवात
Published on

राजकोट : राजकोटच्या स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यात सुरू झालेल्या निर्णायक तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताने राज्य मिळवले. कर्णधार रोहित शर्मा (१९६ चेंडूं १३१ धावा) आणि डावखुरा रवींद्र जडेजा (२१२ चेंडूंत नाबाद ११० धावा) या दोघांनी केलेल्या शतकी प्रहाराच्या बळावर भारताने पहिल्या दिवसअखेर ८६ षटकांत ५ बाद ३२६ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकर सर्फराझ खानने (६६ चेंडूंत ६२ धावा) पदार्पणातच अर्धशतक झळकावून चाहत्यांची मने जिंकली.

उभय संघांतील पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीवर असल्याने या लढतीत दोन्ही संघांत आघाडीसाठी आटापिटा पाहायला मिळेल. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या कसोटीसाठी भारताने संघात चार बदल केले. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, मुकेश कुमार व के. एस. भरत यांच्या जागी रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांचे संघात पुनरागमन झाले, तर २६ वर्षीय सर्फराझ व २३ वर्षीय यष्टिरक्षक ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी देण्यात आली. रोहितने नाणेफेक जिंकून क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

मात्र यशस्वी जैस्वाल (१०), शुभमन गिल (०) आणि रजत पाटिदार (५) हे तिघे पहिल्या अर्ध्या तासातच माघारी परतल्याने भारतीय संघ ३ बाद ३३ अशा संकटात सापडला. मार्क वूडने भेदक गोलंदाजी करत जैस्वाल व गिलला बाद केले. तर टॉम हार्टलीने पाटिदारला चकवले. अशा स्थितीत जडेजाला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. मग रोहित व जडेजा या संघातील दोन सर्वाधिक अनुभवी फलंदाजांनी डोलारा सावरला. त्यांनी उपाहारापर्यंत आणखी पडझड होऊ न देता भारताला ९४ धावांपर्यंत नेले. रोहितने या सत्रात तब्बल ८ कसोटी डावांनंतर अर्धशतकाची वेस ओलांडली.

दुसऱ्या सत्रात रोहित-जडेजा यांनी अधिक आत्मविश्वासाने फलंदाजी केली. या संपूर्ण सत्रात भारताने एकही बळी गमावला नाही. तसेच या मालिकेत पहिल्यांदाच एखाद्या विकेटसाठी १००हून अधिक धावांची भागीदारी रचली. जडेजाने या सत्रात अर्धशतक साकारले. तर रोहित ९७ धावांपर्यंत पोहोचला. त्यामुळे भारताने ३ बाद १८५ धावा केल्या.

तिसऱ्या सत्रातील पहिल्याच षटकात रोहितने शतक पूर्ण केले. रोहितने जो रूट व रेहान अहमद यांच्या गोलंदाजीवर उत्तम षटकारही लगावले. रोहित-जडेजा जोडीने चौथ्या विकेटसाठी तब्बल २०४ धावांची भागीदारी रचली. ही जोडी इंग्लंडला यश मिळून देणार नाही, असे वाटत असतानाच वूडने रोहितल्या शॉट-बॉलच्या जाळ्यात अडकवून भागीदारीला लगाम लावला. रोहितने १४ चौकार व ३ षटकारांसह १३१ धावा केल्या. त्यानंतर मुंबईकर सर्फराझचे टाळ्यांच्या गजरात मैदानात स्वागत झाले. त्याचे वडील नौशाद खान तसेच पत्नी हा क्षण पाहण्यासाठी स्टँडमध्ये उपस्थित होते.

सर्फराझने सुरुवातीपासूनच आक्रमक रूप धारण केले. त्याने प्रत्येक षटकात किमान एक चौकार वसूल केले. हार्टलीला षटकार लगावल्यावर एकेरी धाव घेत त्याने ४८व्या चेंडूवर अर्धशतक साकारले. रणजी स्पर्धेतही ८० ते ९०च्या स्ट्राइक रेटने खेळणाऱ्या सर्फराझने त्याच शैलीत फलंदाजी करताना उपस्थित प्रेक्षकांसह सर्वांची वाहवा मिळवली. तो जडेजाच्या आधी शतक पूर्ण करणार की काय, असेही एकवेळ वाटले. रोहित बाद झाला तेव्हा जडेजा ८४ धावांवर होता. अखेर जडेजा ९९ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात दोघांमध्ये गैरसमज झाला व त्याचा फटका सर्फराझला पडला. ९ चौकार व १ षटकारासह ६२ धावा फटकावणारा सर्फराझ धावचीत होऊन ८२व्या षटकात माघारी परतला. यावेळी रोहितलासुद्धा निराशा लपवता आली नाही व त्याने टोपी भिरकावून दिली. जडेजा व सर्फराझ यांनी पाचव्या विकेटसाठी झटपट ७७ धावांची भर घातली.

त्याच षटकातील पुढच्याच चेंडूवर जडेजाने कारकीर्दीतील चौथे शतक साकारले. घरच्या मैदानावरील त्याचे हे दुसरे शतक आहे. मात्र त्याने फारसा उत्साह न दाखवता फक्त बॅट उंचावली. नाइट-वॉचमन म्हणून आलेल्या कुलदीप यादवसह जडेजाने उर्वरित षटके खेळून काढत भारताला सव्वा तीनशे धावांपलीकडे नेले. दिवसअखेर जडेजा ११०, तर कुलदीप १ धावेवर खेळत आहे. इंग्लंडसाठी वूडने तीन, तर हार्टलीने एक बळी मिळवला आहे. जुरेल व रविचंद्रन अश्विन यांच्या रूपात सक्षम फलंदाज अद्याप शिल्लक असून शुक्रवारी जडेजा तळाच्या साथीदारांसह भारताला ४०० धावांपलीकडे नेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ८६ षटकांत ५ बाद ३२६ (रोहित शर्मा १३१, रवींद्र जडेजा नाबाद ११०, सर्फराझ खान ६२; मार्क वूड ३/६९)

रोहितने कसोटी कारकीर्दीतील ११वे, तसेच मायदेशातील नववे शतक साकारले. इंग्लंडविरुद्ध रोहितचे हे तिसरे शतक ठरले.

कसोटीत भारतासाठी शतक झळकावणारा सर्वाधिक वयस्कर कर्णधार ठरण्याचा मान रोहितने (३६ वर्षे, २९१ दिवस) मिळवला. त्याने विजय हजारे (३६ वर्षे, २७८ दिवस) यांचा १९५१ म्हणजेच ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

सर्फराझने ४८ चेंडूंत अर्धशतक साकारले. भारतासाठी पदार्पणातच वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत त्याने हार्दिक पंड्यासह (२०१७ वि. श्रीलंका) संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले. युवराज ऑफ पतियाळा यांनी १९३४मध्ये ४२ चेंडूंतच पदार्पणात अर्धशतक साकारले होते.

जडेजाने शतकी खेळीदरम्यान कसोटी कारकीर्दीतील ३,००० धावांचा टप्पा गाठला. कसोटीत ३,००० धावा आणि २५० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांनी हा पराक्रम केला आहे.

रोहित-जडेजा यांनी रचलेली २०४ धावांची भागीदारी ही भारतासाठी इंग्लंडविरुद्धच्या एकंदर १३४ कसोटी सामन्यांतील फक्त तिसरी द्विशतकी भागीदारी ठरली. यापूर्वी सचिन-गांगुली यांनी २००२मध्ये २४९, तर विजय हजारे व विजय मांजरेकर यांनी १९५२मध्ये २२२ धावांची भागीदारी रचली होती

logo
marathi.freepressjournal.in