विजय हजारे स्पर्धेत रोहित-विराटचा समावेश?

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दोन्ही माजी कर्णधार तसेच तारांकित फलंदाज देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
विजय हजारे स्पर्धेत रोहित-विराटचा समावेश?
Published on

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दोन्ही माजी कर्णधार तसेच तारांकित फलंदाज देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ते डिसेंबर महिन्याच्या अखेरीस विजय हजारे स्पर्धेत सहभागी होतील, असे समजते.

भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार असून उभय संघांत १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. मात्र या दौऱ्यासाठी ३८ वर्षीय रोहित शर्माकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. त्यातच रोहित व विराट आता कसोटी व टी-२० प्रकारांतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे फक्त एकदिवसीय प्रकारांतच ते दोघे भारताकडून खेळताना दिसतात. रोहित व विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहेत.

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका २५ ऑक्टोबर रोजी संपेल. मग थेट ३० नोव्हेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळेल. या दरम्यानच्या काळात रणजी स्पर्धा सुरू असेल. रोहित-विराट त्या स्पर्धेत खेळणे गरजेचे नाही, कारण दोघेही कसोटीतून निवृत्त झाले आहेत. मात्र आफ्रिकेविरद्धची एकदिवसीय मालिका ६ डिसेंबरला संपणार असून भारताची पुढील एकदिवसीय मालिका थेट ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध असेल.

अशा स्थितीत २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत रोहित-विराट सहभागी होऊ शकतात. २४ डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत मुंबईचा संघ तब्बल ७ सामने खेळणार आहे. तसेच दिल्लीचेही या काळात सात सामने होतील. त्यामुळे रोहित मुंबईकडून व विराट दिल्लीकडून किमान ३ ते ४ लढती खेळेल, असे अपेक्षित आहे.

गतवर्षी, रोहित-विराट रणजी स्पर्धेत आपापल्या संघाकडून एक सामना खेळले. मात्र मे महिन्यात दोघांनीही कसोटीतून निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

रोहित-विराटने लय टिकवणे महत्त्वाचे : अश्विन

२०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी जर संघ व्यवस्थापन रोहित व विराट दोघांचाही विचार करत असेल, तर त्यानुसार त्यांनी दोघांनाही विजय हजारे स्पर्धेत खेळण्याचे आदेश द्यायला हवे, असे भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन म्हणाला. “रोहित-विराट फक्त एकदिवसीय मालिका खेळून २ वर्षे तंदुरुस्ती व फॉर्म टिकवू शकत नाहीत. त्यांना भारत-अ संघाकडून किंवा विजय हजारे स्पर्धेत आपल्या शहराच्या संघाकडून खेळणे गरजेचे असेल. भारतीय संघाला २०२७च्या विश्वचषकासाठी ते दोघेही हवे आहेत. त्यामुळे रोहित-विराटनेही नक्कीच देशांतर्गत स्पर्धेत खेळावे,” असे अश्विन म्हणाला.

गिलकडे नेतृत्वपद सोपवणे योग्य : गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने शुभमन गिलकडे भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. “निवड समिती व संघ व्यवस्थापनाने विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. मला खात्री आहे, की रोहितला याविषयी आधी कल्पना दिली असेल. कारण २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोहित ४० वर्षांचा असेल. त्या तुलनेत आताच रोहित संघात असताना आपण गिलला विश्वचषकाच्या दृष्टीने तयार करू शकतो. त्यामुळे या मुद्द्याविषयी उगाच अतिरिक्त चर्चा करणे अनुचित ठरेल,” असे गांगुली म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in