रोहितकडे आयसीसीच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व

रोहितकडे आयसीसीच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व

वर्षभरात एकदिवसीय प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड आयसीसीने मंगळवारी केली. या ११ जणांमध्ये भारताच्या तब्बल ६ जणांचा समावेश आहे.

दुबई : भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे आयसीसीच्या २०२३ या वर्षातील पुरुषांच्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाचे नेतृत्वपद सोपवण्यात आले. वर्षभरात एकदिवसीय प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड आयसीसीने मंगळवारी केली. या ११ जणांमध्ये भारताच्या तब्बल ६ जणांचा समावेश आहे.

सोमवारी आयसीसीने सर्वोत्तम ११ जणांचा टी-२० संघ जाहीर केला होता. त्या संघाचे नेतृत्वही भारताच्याच सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले होते. टी-२० संघात सूर्यकुमारसह यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग या भारतीयांना स्थान लाभले. मंगळवारी आयसीसीने एकदिवसीय व कसोटी प्रकारातील सर्वोत्तम संघ जाहीर केले. महिलांच्या एकदिवसीय संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान लाभले नाही.

दरम्यान, एकदिवसीय संघात रोहितव्यतिरिक्त सलामीवीर शुभमन गिल, तारांकित फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव या भारतीयांना स्थान देण्यात आले आहे. २०२३च्या विश्वचषकात भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारून उपविजेतेपद मिळवले. या सहाही जणांचा त्या वाटचालीत मोलाचा वाटा होता. कसोटी संघात मात्र रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंच्या रूपात दोनच भारतीय आहेत. पॅट कमिन्स आयसीसीच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. जसप्रीत बुमराला एकाही संघात स्थान न लाभल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आयसीसीचा एकदिवसीय संघ (पुरुष) : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरेल मिचेल, हेन्रिच क्लासेन, मार्को यान्सेन, ॲडम झाम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

आयसीसीचा कसोटी संघ (पुरुष) : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, केन विल्यमसन, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in