
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आगामी इंग्लंड दौरा एका महिन्यावर असताना रोहितने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला. मात्र एकदिवसीय प्रकारात रोहित यापुढेही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. रोहितने इन्स्टाग्रामवर कसोटीच्या कॅपसह निवृत्तीचा संदेश लिहिला.
३८ वर्षीय रोहितने गतवर्षी जूनमध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावल्यावर त्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर रोहित फक्त कसोटी व एकदिवसीय प्रकारात भारताचे नेतृत्व करत होता. मात्र न्यूझीलंडविरुद्ध भारताने मायदेशातच ०-३ असा पराभव पत्करला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका १-३ अशा फरकाने गमावली. या दोन्ही मालिकांमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित सपशेल अपयशी ठरला. त्याला दोन्ही मालिकांत फक्त एकदाच अर्धशतक साकारता आले. तसेच वेगवान गोलंदाजांविरुद्ध तो चाचपडताना दिसला. परिणामी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीही गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत सुमार फॉर्ममुळेच रोहितने स्वत:हून संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच रोहितच्या कसोटीतील भविष्याविषयी चर्चा सुरू होती.
जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका झाल्यानंतर रोहितने एकदिवसीय प्रकारात भारताचे यशस्वी नेतृत्व केले. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. अंतिम फेरीत रोहितने दमदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे त्याच्या या प्रकारातील कामगिरीविषयी कुणालाही शंका नाही. कसोटीत २०१९पासून सलामीला येण्यास सुरुवात केल्यावर रोहितची या प्रकारातील कारकीर्द बहरली होती. तसेच सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्येही रोहित उत्तम लयीत असून त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. मात्र २० जूनपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. २०२५ ते २०२७ या दोन वर्षांच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारत या दौऱ्याद्वारे संघबांधणी करेल. त्यामुळे निवड समिती एखाद्या युवा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवण्याची शक्यता असल्याचे समजते. तसेच सलामीसाठीही असंख्य खेळाडू शर्यतीत असल्याने रोहितने निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ समजून कसोटीला अलविदा केला.
“मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटच्या सर्वाधिक आव्हानात्मक प्रकारात पांढऱ्या कपड्यात देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार. एकदिवसीय प्रकारात मी भारताचे प्रतिनिधित्व यापुढेही करत राहणार आहे,” असे रोहितने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या निवृत्तीच्या संदेशात म्हटले.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील अपयशानंतर रोहित रणजी ट्रॉफी स्पर्धेतही खेळला. मात्र एका सामन्यात त्याला फक्त ३१ धावाच करता आल्या. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीनंतर रोहितने निवृत्तीच्या अफवा धुडकावून लावल्या होत्या. मात्र आता इंग्लंड दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघ जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रोहितशी यासंबंधी संवाद साधला. त्यानुसार निवड समिती नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. रोहित फलंदाज म्हणून इंग्लंड दौऱ्यावर जाणे अपेक्षित होते. मात्र रोहितने त्यापूर्वीच थेट निवृत्ती जाहीर करून सर्व चर्चांना पूर्णविराम लगावला. त्यामुळे त्याची निवृत्ती अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली.
कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी कशी?
-२०२१मध्ये विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.
-रोहितने २४ कसोटींमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी भारताने १२ लढती जिंकल्या, तर ९ मध्ये त्यांचा पराभव झाला. ३ कसोटी अनिर्णित राहिल्या.
-रोहितच्या नेतृत्वात भारताने २०२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरी गाठली. मात्र भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
-कर्णधार म्हणून रोहितने २४ कसोटींमध्ये ४ शतके झळकावले. त्याची सरासरी मात्र फक्त ३०.५८ इतकी राहिली.
कर्णधारपदासाठी पर्याय कोण?
रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या व पाचव्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते. तोच सध्या भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. मात्र बुमराची तंदुरुस्ती आणि त्याच्यावर असलेला गोलंदाजीचा भार, या सर्व बाबींचा विचार करता त्याला कर्णधारपद सोपवण्यात येणार नाही, असे समजते. त्यामुळे शुभमन गिल, ऋषभ पंत, के. एल. राहुल यांच्यापैकी एकाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. रवींद्र जडेजाही जवळपास निवृत्तीच्या जवळ आहे. तर विराट कोहली पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. आयपीएल संपल्यावर नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात येईल.
रोहितची कसोटी कारकीर्द
-पदार्पण : वि. वेस्ट इंडिज (नोव्हेंबर २०१३)
-अखेरची लढत : वि. ऑस्ट्रेलिया (डिसेंबर २०२४)
-सामने : ६७
-धावा : ४,३०१
-सरासरी : ४०.५७
-अर्धशतके : १८
-शतके : १२
-सर्वोच्च : २१२