
दुबई : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा मला अत्यानंद आहे. मात्र यामुळे मी एकदिवसीय प्रकारातून निवृत्त होत आहे, असे समजू नका. कृपया करून याविषयी अफवाही पसरवू नका. माझी निवृत्ती अद्याप दूर आहे, अशा स्पष्ट शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीसंदर्भात सुरू असलेल्या सर्व चर्चांना धुडकावून लावत पूर्णविराम दिला.
३७ वर्षीय रोहितच्या नेतृत्वात रविवारी भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. भारताने २००२ व २०१३ नंतर ही स्पर्धा जिंकली. तसेच इतिहासात प्रथमच भारताने सलग दोन आयसीसी स्पर्धांचे जेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला. गतवर्षी जूनमध्ये भारताने टी-२० विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यानंतर रोहितने टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. आता थेट २०२७मध्ये एकदिवसीय विश्वचषक रंगणार असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित एकदिवसीय प्रकारातूनही निवृत्त होणार का, या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र रोहितने रविवारी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या चर्चांना पूर्णविराम लावला. तसेच मैदानातही विराट कोहलीसह छायाचित्र घेताना स्वत:च्याच अनोख्या शैलीत आम्ही दोघेही निवृत्त होत नसल्याचे सांगितले.
“एक गोष्ट जाणीवपूर्वक स्पष्ट करू इच्छितो की मी एकदिवसीय प्रकारातून निवृत्तीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. भविष्याचा विचार आताच करणे अयोग्य आहे. सध्या जे सुरू आहे, तसेच चालू राहील. त्यामुळे माझ्या निवृत्तीविषयी अफवा पसरवू नका. त्याविषयी चर्चा करणे थांबवा. भारताने मिळवलेल्या यशाचा आनंद लुटा,” असे रोहित म्हणाला.
अंतिम फेरीत रोहितने ८३ चेंडूंत ७६ धावांची निर्णायक खेळी साकारली. त्यामुळे भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत गाठले. रोहितलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. रोहित हा सलग चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत भारताचे नेतृत्व करणाराही पहिलाच कर्णधार ठरला होता.
“गेल्या २-३ वर्षांपासून मी याचप्रकारे खेळत आहे. कित्येकदा पॉवरप्लेचा लाभ उचलण्याच्या प्रयत्नात मी बादही होतो. त्यामुळे तुम्ही माझ्यावर टीकाही कराल. परंतु संघ व्यवस्थापन व माझ्या मनात सर्व सुरळीत आहे. त्यामुळे अंतिम फेरीतही मी त्याचप्रमाणे खेळ केला. पॉवरप्लेनंतर धावा करणे कठीण जात असल्याचे आपण पाहिलेच. त्यामुळे पहिल्या १० षटकांत अधिकाधिक धावा करणे फार महत्त्वाचे आहे,” असेही रोहितने नमूद केले. तसेच संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपद मिळवून भारतीय खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून दिले. त्यामुळे रोहितने सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
दरम्यान, अंतिम फेरीत रोहितने ८३ चेंडूंत ७६ धावांची निर्णायक खेळी साकारली. त्यामुळे भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत गाठले. रोहितलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.