आक्रमक खेळण्याशिवाय रोहितला पर्याय नाही : शास्त्री

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांत यशस्वी होण्यासह सहाव्या स्थानी फलंदाजी करूनही रोहित शर्माने आक्रमक वृत्ती सोडू नये, असा सल्ला माजी क्रिकेटपटू तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला आहे.
आक्रमक खेळण्याशिवाय रोहितला पर्याय नाही : शास्त्री
Published on

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांत यशस्वी होण्यासह सहाव्या स्थानी फलंदाजी करूनही रोहित शर्माने आक्रमक वृत्ती सोडू नये, असा सल्ला माजी क्रिकेटपटू तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला आहे.

कर्णधार रोहित पहिल्या कसोटीला मुकला. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत त्याने अनुक्रमे १०, ३, ६ अशा धावा केल्या. मुख्य म्हणजे सलामीचे स्थान सोडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा रोहितचा निर्णय शास्त्रींसह अनेकांना पटलेला नाही. मात्र रोहित उर्वरित सामन्यांमध्येही त्याच स्थानी फलंदाजी करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शास्त्री यांनी रोहितला मोलाचा सल्ला दिला आहे.

“दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत रोहित त्याच्या नैसर्गिक वृत्तीच्या विरुद्ध खेळताना दिसला. सहाव्या स्थानी फलंदाजी करूनही तो सलामीप्रमाणेच आक्रमण करू शकतो. त्याच्यात ती क्षमता आहे. रोहितने चेंडू वाया घालवले अथवा खेळपट्टीवर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला, की तो चाचपडताना दिसतो. त्यामुळे आक्रमणच त्याच्यासाठी योग्य आहे,” असे शास्त्री म्हणाले.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची मालिका तूर्तास १-१ अशी बरोबरीत आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे चौथी कसोटी सुरू होईल.

रोहित, आकाश यांना दुखापत

रविवारी मेलबर्न येथे सराव करताना रोहितच्या डाव्या गुडघ्याला, तर वेगवान गोलंदाज आकाश दीपच्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीचे स्वरूप किती गंभीर आहे, हे समजलेले नाही. रोहित मात्र गुडघ्याभोवती पट्टी बांधून बसलेला दिसला. तसेच भारतीय संघाला सरावासाठी देण्यात आलेल्या खेळपट्ट्या काहीशा संथ आहेत, असे समजते. त्यामुळे प्रत्यक्षात सामन्यासाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी व सरावाची खेळपट्टी यामध्ये तफावत असू शकते.

logo
marathi.freepressjournal.in