

चेन्नई : वानखेडे स्टेडियमवर रविवारी जमलेल्या तमाम दर्दी क्रिकेटप्रेमींना फिट आणि तंदुरुस्त रोहित शर्माचा नवा अवतार पाहायला मिळाला. रोहितने काही नेत्रदीपक फटक्यांसह ३८ चेंडूंतच ७८ धावांची शानदार खेळी साकारली. त्याला मुंबईकर शार्दूल ठाकूर (३ बळी) व रायन रिकल्टन (४३ चेंडूंत ८१ धावा) यांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे मुंबईने तब्बल १४ वर्षांनंतर आयपीएलमध्ये सलामीचा सामना जिंकला.
वानखेडेवरील या लढतीत मुंबईने कोलकाताचा ६ गडी व ५ चेंडू राखून धुव्वा उडवला. २०१२नंतर प्रथमच मुंबईने आयपीएलमध्ये विजयारंभ केला. तसेच आयपीएलच्या इतिहासात मुंबईने प्रथमच २२१ धावांचे लक्ष्य गाठले. रोहितसह सर्व फलंदाजांनी ज्याप्रकारे फटकेबाजी केली, ते पाहून कोलकाताचे गोलंदाजही अवाक झाले. त्यामुळे यंदा मुंबईचा संघ सहाव्या जेतेपदासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसून आले. भारताच्या माजी क्रिकेटपटूंसह अनेक दिग्गजांनीदेखील रोहितने असाच फॉर्म कायम राखला, तर मुंबई इंडियन्सला रोखणे कठीण जाईल, असे मत नोंदवले. तसेच भारताच्या दृष्टीने ही बाब अत्यंत लाभदायी असल्याचेही मत चाहत्यांनी नोंदवले.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसणार आहेत.
आयपीएलचा १९वा हंगाम शनिवारपासून सुरू झाला. बंगळुरू-हैदराबाद, मुंबई-कोलकाता या लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. तर चेन्नईविरुद्ध राजस्थानने गोलंदाजीच्या बळावर बाजी मारली. मुंबईच्या विजयाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळताना मुंबईला गतवर्षी क्वालिफायर-२मध्ये पराभव पत्करावा लागला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मुंबईला यंदा जेतेपदाचा षटकार लगावण्याची उत्तम संधी आहे. कारण भारताने नुकताच जिंकलेल्या टी-२० विश्वचषकातील चार सदस्य म्हणजेच हार्दिक, सूर्यकुमार, तिलक वर्मा आणि बुमरा मुंबईच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय रोहितचा अनुभव आहेच. रोहितने वयाच्या ३८व्या वर्षी जबरदस्त फिटनेस राखली असल्याने तो आणखी घातक ठरत आहे.
रोहितने २३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याचे हे आयपीएलच्या इतिहासातील आजवरचे वैयक्तिक वेगवान अर्धशतक ठरले.