कर्णधारपदावरून रोहितला डच्चू; गिलकडे भारताच्या एकदिवसीय संघाची धुरा

भारतीय निवडकर्त्यांनी शनिवारी एकदिवसीय संघ निवडताना धक्कादायक नेतृत्वबदल केला. रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून युवा खेळाडू शुभमन गिलच्या खांद्यावर एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
कर्णधारपदावरून रोहितला डच्चू; गिलकडे भारताच्या एकदिवसीय संघाची धुरा
बीसीसीआय
Published on

अहमदाबाद : भारतीय निवडकर्त्यांनी शनिवारी एकदिवसीय संघ निवडताना धक्कादायक नेतृत्वबदल केला. रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून युवा खेळाडू शुभमन गिलच्या खांद्यावर एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. आगामी २०२७ ची विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून हे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

महेंद्रसिंह धोनी वगळता रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या मर्यादीत षटकांच्या ३ अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यात टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा समावेश आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ५६ पैकी ४२ एकदिवसीय सामने खिशात घातले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयाची सरासरी ७६ टक्के आहे.

दरम्यान निवडकर्त्यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारांत गिलकडे नेतृत्व सोपवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शनिवारी भारतीय एकदिवसीय संघ जाहीर करण्यात आला. १५ खेळाडूंच्या या संघात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संधी देण्यात आली आहे. या ३ सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयर अय्यरकडे संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने सिडनी, ॲडलेड आणि मेलबर्न येथे १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. तसेच यावेळी उभय संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिकाही होणार आहे.

कामाच्या अतिरीक्त ताण असल्यामुळे स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितले की, रोहित शर्माला नेतृत्वबदलाबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित आणि विराटला संधी मिळणार का ? यावर आगरकर यांनी बोलणे टाळले.

एकदिवसीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल.

टी-२० संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर.

logo
marathi.freepressjournal.in