रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट की रिटायर्ड आऊट?दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीला उतरल्याने वादाला फोडणी

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१२ धावा केल्या
रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट की रिटायर्ड आऊट?दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीला उतरल्याने वादाला फोडणी

बंगळुरू : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी झालेला अखेरचा टी-२० सामना तब्बल दोन सुपर ओव्हरनंतर निकाली निघाला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारताने बाजी मारली असली तरी रोहित शर्मा पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रिटायर्ड हर्ट होता की रिटायर्ड आऊट याच्यावरून सध्या बराच खल सुरू आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१२ धावा केल्या. यानंतर अफगाणिस्तान संघानेही ६ विकेट्सच्या मोबदल्यात २१२ धावा केल्या, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी १६ धावा केल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र भारताने ठेवलेले १२ धावांचे लक्ष्य गाठताना अफगाणिस्तानला फक्त एक धाव काढता आली. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने पाहुण्यांचे दोन्ही विकेट्स बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूआधी रोहित शर्मा रिटायर होऊन मैदानाबाहेर गेला. पहिल्या सुपर ओव्हरच्या पाचव्या चेंडूनंतर रोहित स्वत: डग आऊटमध्ये गेला अन् रिंकू सिंगला मैदानावर पाठवले. पण, सामना बरोबरीत सुटल्याने तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीला आला. काहींच्या मते, नियमानुसार जर सुपर ओव्हरमध्ये एखादा फलंदाज बाद किंवा रिटायर्ड आऊट झाला असेल तर तो पुढील सुपर ओव्हरमध्ये येऊ शकत नाही. पण, रोहित फलंदाजीला आल्याने त्याच्यावर चिटिंगचा आरोप होऊ लागला. तो रिटायर्ड हर्ट झालेला की रिटायर्ड आऊट, हे स्पष्ट न झाल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियम २५.४.२ नुसार, जर एखादा फलंदाज दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे रिटायर होत असेल तर तो फलंदाज आपला डाव पुन्हा सुरू करण्याचा हक्कदार आहे. म्हणजेच तो पुन्हा फलंदाजीस येऊ शकतो. पण जर काही कारणास्तव तो फलंदाज त्या सामन्यात पुन्हा फलंदाजीस येऊ शकला नाही तर त्या फलंदाजाची नोंद ‘रिटायर्ड नॉट आऊट’ म्हणून केली जाते.

नियम २५.४.३ नुसार, जर एखादा फलंदाज २५.४.२ व्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव रिटायर झाला तर तो फलंदाज केवळ विरोधी संघाच्या कर्णधाराच्या संमतीनेच फलंदाजीस येऊ शकतो. पण जर तो फलंदाजी येऊ शकला नाही तर त्याची नोंद ‘रिटायर्ड आऊट’ म्हणून केली जाईल.

नियमानुसार दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित पुन्हा फलंदाजीला आला. पण त्याआधी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झाद्रानची संमती घ्यायला हवी होती. पण कोच जोनाथन ट्रॉटने आपल्याला याबाबत काहीही कल्पना नव्हती, असे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितल्याने हा वाद आणखीनच चिघळला आहे.

logo
marathi.freepressjournal.in