रोहितच्या निवृत्तीची चर्चा; लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना ठरू शकतो कारकीर्दीतील अखेरचा

भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी लॉर्ड्सवर होणारा तिसरा एकदिवसीय सामना हा तारांकित फलंदाज रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले आहे.
रोहितच्या निवृत्तीची चर्चा; लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना ठरू शकतो कारकीर्दीतील अखेरचा
रोहितच्या निवृत्तीची चर्चा; लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना ठरू शकतो कारकीर्दीतील अखेरचाX
Published on

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी लॉर्ड्सवर होणारा तिसरा एकदिवसीय सामना हा तारांकित फलंदाज रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रीय निवड समिती सध्या सुरू असलेल्या मालिकेनंतर या मर्यादित षटकांच्या महान खेळाडूचा विचार करण्याची शक्यता नाही. रोहितने आपल्या गेल्या आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ ३०.१च्या सरासरीने आणि ८८.६च्या स्ट्राईक रेटने फक्त एका अर्धशतकासह एकूण २४१ धावा केल्या आहेत. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या दौऱ्यावरील निवडकर्ते म्हणून कार्डिफमध्ये असून, पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी ते ३९ वर्षीय रोहितचा विचार करत नसल्याचे समजते. रोहितच्या नेतृत्वात भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक व २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या. मात्र गतवर्षी त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले.

निवड समितीच्या बाबींशी संबंधित ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ (बीसीसीआय)च्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, राष्ट्रीय निवडकर्ते तीन डावात दोन शतके झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालला दीर्घ संधी देण्यास उत्सुक आहेत. पुढे साधारण २० सामने होणार असून यशस्वीला ते सर्व २० सामने खेळवणे आवश्यक आहे. रोहितला कोणीही निवृत्त होण्यास सांगू शकत नाही, परंतु आगामी सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून निवडकर्ते पुढे पाहू इच्छितात हे अगदी स्पष्ट आहे. रोहितच्या भविष्याचा निर्णय त्याने स्वतः घ्यायचा आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आगरकर हे विराट कोहलीच्या फॉर्म आणि तंदुरुस्तीमुळे तो संघात असण्याबाबत एकाच मतावर आहेत, परंतु रोहितबाबत मात्र तसे नाही.

इंग्लंड दौऱ्यानंतरही रोहितला संघात कायम ठेवले, तर पुढच्या रांगेत असलेल्या यशस्वीला खेळण्याची मौल्यवान संधी मिळणार नाही, असे समजते. कसोटी निवृत्तीबाबतही निवड समिती आणि रोहित एकाच मतावर नव्हते, हे येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे. निवड समितीच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे होते की, इंग्लंडमधील पाचपैकी दोन कसोटी सामने खेळून रोहितने निर्णय घ्यावा असे त्यांना वाटत नव्हते, तर रोहितच्या बाजूच्या सूत्रांनुसार त्याचा केवळ दोन सामने खेळण्याचा कधीही हेतू नव्हता आणि त्याने संपूर्ण मालिकेसाठी स्वतःला उपलब्ध केले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in