

मुंबई : २७ नोव्हेंबर, २०२३ या दिवशी रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून प्रवास अनपेक्षितपणे संपुष्टात आला होता. अखेर तीन वर्षांनी २७ नोव्हेंबर रोजीच त्याच्या गळ्यात पुन्हा कर्णधारपदाची माळ घालण्यात आली. ‘मुंबईचा राजा’ नावाने विश्वभरात लोकप्रिय असलेल्या रोहितचे जणू एकप्रकारे पुनरागमन झाले असून यामुळे असंख्य चाहतेदेखील सुखावले आहेत.
पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने आगामी २०२७च्या हंगामासाठी अनुभवी रोहितकडे पुन्हा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तब्बल तीन हंगामांनंतर रोहित पुन्हा नेतृत्वाच्या भूमिकेत परतणार आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या पंजाब किंग्ज संघात दाखल झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार कोण होणार, याची उत्सुकता लागून होती. अखेर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ मिनिटांनी रोहितच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संघाच्या ऐतिहासिक २०व्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर रोहितच्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई इंडियन्सने ट्विटर, इंस्टाग्राम यावर पोस्ट केलेल्या व्हिडिओलाही मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत.
३९ वर्षीय रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०) आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे आगामी हंगामात संघाची कामगिरी सुधारण्याची जबाबदारी पुन्हा त्याच्यावर असेल. २०११पासून रोहित मुंबईचा भाग आहे, तर २०१३मध्ये त्याने सर्वप्रथम कर्णधारपद भूषवले होते. “आयपीएलच्या २०व्या हंगामासाठी आणि आगामी आव्हानांसाठी मी सज्ज आहे. आमच्या पलटणला आनंद साजरा करण्यासाठी अनेक अविस्मरणीय क्षण देण्याचा माझा प्रयत्न असेल. आमच्या शैलीचे क्रिकेट खेळणे, एकत्रितपणे प्रतिस्पर्ध्यांशी लढणे आणि खेळाचा आनंद घेणे यावर आमचा भर असेल,” असे रोहित म्हणाला.
“मुंबई इंडियन्स हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. या संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब राहिली आहे. नीता भाभी आणि आकाश अंबानी यांच्यासोबत आगामी हंगामाबाबत झालेल्या चर्चा उत्साहवर्धक होत्या. एकत्रितपणे आपण चांगली कामगिरी करू शकतो, असा मला विश्वास आहे,” असेही रोहितने सांगितले.
रोहितच्या नेतृत्वात २०२१ मध्ये मुंबईला पाचव्या, २०२२ मध्ये दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. २०२३ मध्ये क्वालिफायर-२ मध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिककडे नेतृत्व सोपवले. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखालीही अपेक्षित यश मिळाले नाही. २०२४ मध्ये संघ दहाव्या, तर २०२६ मध्ये नवव्या स्थानावर राहिला. २०२५ मध्ये मुंबईने क्वालिफायर-२ पर्यंत मजल मारली, मात्र तेथे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. सलग तिसऱ्या हंगामात विजेतेपद मिळवण्यात अपयश आल्यानंतर हार्दिकला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
हार्दिकच्या बदलीसाठी मुंबईने गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यासह अनेक संघांशी चर्चा केली. अखेर पंजाब किंग्जसोबत खेळाडूंच्या अदलाबदलीवर सहमती झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. त्यानंतर मुंबईने पुन्हा आपल्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारावर विश्वास दाखवला. सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा आणि तिलक वर्मा हेही नेतृत्वासाठी पर्याय होते; मात्र अखेर रोहितची निवड करण्यात आली.
मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी रोहितच्या पुनरागमनाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, “मुंबई इंडियन्सच्या २०व्या हंगामात रोहित पुन्हा संघाचे नेतृत्व करणार आहे, हा आमच्यासाठी विशेष क्षण आहे. त्याने आम्हाला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. आमच्या पलटणसाठी त्याचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.”
कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयांचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर असून त्याने २३५ सामन्यांत १३६ विजय मिळवले आहेत. मात्र धोनी कधीच रोहितच्या संघाला अंतिम फेरीत नमवू शकलेला नाही. त्यामुळे रोहितला आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधारही मानले जाते. आता मुंबईच्या ऐतिहासिक २०व्या हंगामात रोहित पुन्हा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार असून, संघाला सहाव्यांदा विजेतेपद मिळवून देण्याचे त्याचे लक्ष्य असेल.
कर्णधार रोहितची कामगिरी कशी?
सामने: १५८
विजय: ८७
२०११ पासून मुंबईचा सदस्य
मुंबई इंडियन्सला मिळवून दिलेली आयपीएल विजेतेपदे: ५
कर्णधारपदाचा कार्यकाळ: २०१३ ते २०२३
पुन्हा नेतृत्व: आयपीएल २०२७
सहाव्या जेतेपदाचे लक्ष्य
२०१३ मध्ये रोहितकडे प्रथम मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच आयपीएल विजेतेपदे मिळवली. याशिवाय २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. मात्र, २०२० नंतर मुंबईच्या कामगिरीत सातत्याने चढ-उतार दिसून आले. आयपीएल कारकीर्दीत रोहितने २८१ सामन्यांत ७,३२९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतके आणि ४९ अर्धशतके आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीनंतर रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्णधार म्हणून त्याने १५८ सामन्यांत ८७ विजय मिळवले आहेत. एकूण टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २२० सामन्यांत नेतृत्व करताना १४० सामने जिंकले आहेत.
प्रशिक्षकांचीही बदली
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक वर्गातही मोठे बदल झाले आहेत. किरॉन पोलार्डकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महेला जयवर्धने यांना मुंबईने सोडचिठ्ठी दिली आहे. रॉबिन उथप्पा फलंदाजी प्रशिक्षक, न्यूझीलंडचा मिचेल मॅक्लेनघन गोलंदाजी प्रशिक्षक, तर भारताचे माजी प्रशिक्षक टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.