"बरं झालं, सूर्याच्या हातात बॉल बसला; नाहीतर मी त्याला..." भर सभागृहात रोहित शर्मा हे काय बोलून गेला?

रोहित शर्मानं विधानभवनात मराठीतून केलं भाषण, सूर्यकुमारला मुख्यमंत्र्यांसमोरच म्हणाला...
"बरं झालं, सूर्याच्या हातात बॉल बसला; नाहीतर मी त्याला..." भर सभागृहात रोहित शर्मा हे काय बोलून गेला?

मुंबई: यंदाचा टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर विश्वविजेता भारतीय संघ काल मायदेशी परतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन संपूर्ण संघ दुपारी मुंबईमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर मुंबईमध्ये लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत चॅम्पियन 'टीम इंडिया'ची मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विक्ट्री परेड काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडीयमवर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान आज महाराष्ट्राच्या विधानभवनात विश्वविजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बहुतेक आमदार उपस्थित होते. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान रोहित शर्मानं मराठीमध्ये भाषण केलं.

रोहित शर्मानं मराठीतून केलं भाषण, म्हणाला...

रोहित शर्मा म्हणाला की, "सगळ्यांना माझा नमस्कार, आम्हाला इकडे बोलावल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे आभार. सर्वांना पाहून बरं वाटलं. मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच मला सांगितलं की, असा कार्यक्रम इकडे यापूर्वी कधी झाला नाहीये. आमच्यासाठी असा कार्यक्रम ठेवला, हे पाहून आम्हालाही भरपूर आनंद झाला. काल आम्ही मुंबईमध्ये बघितलं, ते सगळ्यांसाठी स्वप्न होतं, आमच्यासाठीही मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचाय. आम्ही ११ वर्ष या वर्ल्ड कपसाठी थांबलो होतो. २०१३ ला आम्ही शेवटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो होतो. मी सगळ्यांचा खूप आभारी आहे, माझ्या संघातील सहकाऱ्यांचा आभारी आहे. हे फक्त माझ्यामुळे किंवा सूर्या, दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं, तर सगळ्या खेळाडूंमुळे झालं आहे. मी नशीबवानही आहे, कारण मला जी टीम मिळाली होती, त्यात सगळे प्लेअर सॉलिड होते. टीमला गरज होती तेव्हा प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळ्या प्लेअरनी हात वर केला आणि आपल्याला जिंकवलं’, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली.

बरं झालं, सूर्याच्या हातात बॉल बसला; नाहीतर...

रोहित शर्मानं अंतिम सामन्यातील सूर्यकुमार यादवच्या अप्रतिम झेलवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, "सूर्यानं आता सांगितलं की, त्याच्या हातात बॉल बसला. बरं झालं त्याच्या हातात बॉल बसला. नाहीतर मी पुढे त्याला बसवला असता." रोहित शर्माच्या या वाक्यावर स्वतः रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह सभागृहात सर्वत्र हशा पिकला. "सगळ्यांचे धन्यवाद, धन्यवाद मुंबई. जय हिंद जय महाराष्ट्र", असं म्हणून रोहित शर्माने भाषण संपवलं.

logo
marathi.freepressjournal.in