

दुबई : भारताचा तारांकित फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्माने बुधवारी आयसीसीच्या जागतिक एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली. ३८ वर्षीय रोहितने कारकीर्दीत प्रथमच हा पराक्रम केला, हे विशेष.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकताच झालेल्या एकदिवसीय मालिकेत रोहितने ३ सामन्यांत सर्वाधिक २०२ धावा केल्या. यामध्ये १ शतक व १ अर्धशतकाचा समावेश होता. तिसऱ्या लढतीत रोहितने नाबाद १२१ धावांची खेळी साकारली व संघाला विराट कोहलीच्या साथीने सामना जिंकवून दिला. त्यामुळे रोहितला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. त्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित ७४५ गुणांसह तिसऱ्या स्थानी होता.
मात्र आता रोहितच्या खात्यात ७८१ गुण जमा आहेत. तसेच यापूर्वी अग्रस्थानी असलेल्या भारतीय कर्णधार शुभमन गिलची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गिलचे आता ७४५ गुण आहेत. अफगाणिस्तानचा इब्राहिम झादरान ७६४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली ७२४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे पाकिस्तानचा बाबर आझम व न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल आहे.
दरम्यान, २००७मध्ये भारताकडून पदार्पण करणाऱ्या रोहितला २७६ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. त्याच्या नावावर ३३ शतके व ५९ अर्धशतकेही जमा आहेत. एकदिवसीय क्रमवारीत रोहितने अनेकदा दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. मात्र १८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अखेर प्रथमच त्याने अग्रस्थान काबिज केले. कसोटी व टी-२० तून रोहित निवृत्त झाला असून २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तो भारतीय संघात टिकून राहणार का, हे पाहणे रंजक ठरेल.