
मुंबई : भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि तारांकित फलंदाज विराट कोहली यांच्या पुनरागमनासाठी तमाम चाहत्यांना ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. थेट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रोहित-विराट पुन्हा एकदा भारताकडून खेळताना दिसतील. पुढील तीन महिने भारताचा एकही एकदिवसीय सामना नसल्याने रोहित-विराटचे पुनरागमन लांबले आहे.
भारताचा ऑगस्टमध्ये बांगलादेश दौरा अपेक्षित होता. मात्र तेथील स्थिती योग्य नसल्याने हा दौरा रद्द करण्यात आला. या दौऱ्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध प्रत्येकी ३ एकदिवसीय व ३ टी-२० सामने खेळणार होता. रोहित-विराट आता टी-२० व कसोटीतून निवृत्त झाले असल्याने या एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना त्यांना पुन्हा एकत्रित खेळताना पाहण्याची संधी मिळाली असती.
तसेच बांगलादेश दौरा रद्द झाल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) श्रीलंकेविरुद्ध दौरा आयोजित करण्याच्या विचारात होती. ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये टी-२० प्रकारात आशिया चषक सुरू होणार आहे. नियमित कर्णधार सूर्यकुमार यादव आशिया चषकात भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व करेल. त्यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय व ३ टी-२० लढती आयोजित करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील होती. कारण इतक्या कमी कालावधीत तेच शक्य होते. मात्र इंग्लंड दौऱ्यावरून नुकताच परतलेल्या भारतीय संघांतील काही खेळाडूंनी पूर्णपणे विश्रांतीची मागणी केली आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्यांची विनंती मान्य करत आता आशिया चषकापूर्वी एकही लढत आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते. भारतीय संघ २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळला. जवळपास दोन महिने भारतीय संघ इंग्लंडमध्ये स्थायिक होता.
दरम्यान, आशिया चषकाची अंतिम फेरी २८ सप्टेंबरला आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. मग १९ ऑक्टोबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ होईल. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामने खेळणार आहे. १९ तारखेला पहिला एकदिवसीय सामना असून २० तारखेला देशभरात दिवाळी साजरी केली जाईल. त्यामुळे या लढतीद्वारेच रोहित-विराटचे पुनरागमन होईल, असे सध्या अपेक्षित आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांनंतर रोहित-विराट मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धही ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. १४ नोव्हेंबरपासून आफ्रिका भारत दौऱ्यावर येईल. यामध्ये प्रथम २ कसोटी, ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामने असे स्वरूप असेल. १९ डिसेंबरला हा दौरा समाप्त होईल. मग जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामने खेळणार आहे. २०२६च्या मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक आयोजित करण्यात येणार असल्याने सध्या टी-२० सामन्यांचे अधिक आयोजन करण्यावर आयसीसी व बीसीसीआयचा भर आहे.
दरम्यान, आयसीसीने २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांच्या पर्वाची उत्तम सुरुवात करताना भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेत २-२ असे बरोबरीत रोखले. भारताने सलग दुसऱ्यांदा इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले, हे विशेष.
* रोहित-विराट दोघेही मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताकडून अखेरचा सामना खेळले. भारताने ९ मार्च रोजी झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला नमवून रोहितच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली.
* त्यानंतर आयपीएलमध्ये रोहितने मुंबईचे, तर विराटने बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी-२०मधून गेल्या वर्षीच जूनमध्ये निवृत्ती जाहीर केली, तर यंदा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे आयपीएल १० दिवसांसाठी स्थगित झाली होती.
* त्या काळात प्रथम रोहित व नंतर विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
भारताचा आगामी कार्यक्रम
-आशिया चषक स्पर्धा (टी-२० प्रकारात) : ९ ते २८ सप्टेंबर
-भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका : २ ते १४ ऑक्टोबर
-भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा : १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर
-दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा : १४ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर
-न्यूझीलंडचा भारत दौरा : ११ ते ३१ जानेवारी