रोहित-विराटने रणजी स्पर्धेत खेळावे; माजी क्रिकेटपटूंचा निशाणा; प्रशिक्षक गंभीरची मात्र पाठराखण

रोहित शर्मा, विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनीही रणजी स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवासाठी प्रामुख्याने अनुभवी खेळाडूच जबाबदार आहेत, अशी टीका माजी क्रिकेटपटूंनी केली आहे.
रोहित-विराटने रणजी स्पर्धेत खेळावे; माजी क्रिकेटपटूंचा निशाणा; प्रशिक्षक गंभीरची मात्र पाठराखण
Published on

पुणे : रोहित शर्मा, विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनीही रणजी स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवासाठी प्रामुख्याने अनुभवी खेळाडूच जबाबदार आहेत, अशी टीका माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. यामध्ये रवी शास्त्री, दिनेश कार्तिक, संजय मांजरेकर, कीर्ती आझाद, हरभजन सिंग यांचा समावेश आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे न्यूझीलंडने ३ लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. २०१२नंतर प्रथमच भारताला मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली. यापूर्वी इंग्लंडने २०१२मध्ये भारताला २-१ असे नमवले होते. त्यामुळे रोहितच्या शिलेदारांवर चोहीकडून टीका करण्यात येत असून यामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही निशाणा साधण्यात येत आहे. मात्र माजी क्रिकेटपटूंनी गंभीरची पाठराखण केली आहे. तसेच रोहित, विराटसह रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंवरही माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे.

“निश्चितपणे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवामागे अनुभवी खेळाडूंचे अपयश मुख्य कारण आहे. जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा अनुभवी खेळाडूंना श्रेय दिले जाते. मग पराभवातही त्यांच्या कामगिरीकडे सर्वप्रथम बोट जाणे स्वाभाविक आहे. संघातील चारही अनुभवी खेळाडू स्वत: त्यांच्या कामगिरीबाबत निराश असतील,” असे कार्तिक म्हणाला.

“रोहित-विराट यांनाही कसोटी मालिका नसताना रणजी स्पर्धेत खेळण्याची सक्ती करण्यात यावी. न्यूझीलंडविरुद्धचे अपयश सहज पचवता येण्यासारखे नाही. मात्र आता बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी त्यांनी रणजी स्पर्धेत थोडासा वेळ घालवला, तर ते त्यांच्यासह भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. बीसीसीआयने हा नियम सर्वांसाठी लागू करावा. अनुभवी अथवा वरिष्ठ खेळाडूंना यातून सूट दिल्याने चुकीचा संदेस युवा पिढीपर्यंत पोहोचत आहे,” असे कीर्ती आझाद म्हणाले.

“न्यूझीलंडने दोन्ही सामन्यांत भारताला पूर्णपणे निष्प्रभ केले. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमीच. मात्र याचे खापर प्रशिक्षकावर फोडणे चुकीचे ठरेल. गंभीरने प्रशिक्षकपद स्वीकारून आताशी ४ महिने झाले आहेत. त्यामुळे त्यालाही रुळण्यास वेळ लागेल. तसेच पुढील १-२ वर्षांत रोहित, विराट, अश्विन, जडेजा यांची अनुभवी चौकडी कसोटीतून निवृत्ती पत्करू शकते. अशा स्थितीत गंभीर संघाची बांधणी कशी करणार, हे पाहावे लागेल,” असे रवी शास्त्री म्हणाले.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तिसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका खेळवण्यात येईल. त्यामुळे आगामी काळ भारताची कसोटी घेणारा ठरणार आहे.

‘ते’ दिवस आता गेले : सायमन डूल

भारतीय फलंदाज फिरकीपटूंना उत्तमरित्या खेळतात, असा गैरसमज आहे. एकेकाळी भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण असे तारांकित फलंदाज होते. ते फिरकीवर सहज वर्चस्व गाजवायचे. मात्र भारताच्या सध्याच्या संघातील फलंदाज हे फिरकीला पोषक खेळपट्टीवर अन्य संघांप्रमाणेच संघर्ष करू शकतात, हे न्यूझीलंडने दाखवून दिले. त्यामुळे भारताचे खेळाडू फिरकीला अन्य संघांच्या तुलनेत उत्तम खेळतात, असे आता समजू नका, अशा कणखर शब्दांत न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूलने त्याचे मत मांडले. त्यांच्या या मताचे अनेक भारतीय चाहत्यांनीही समर्थन केले आहे.

फलंदाजांचा क्रम बदलणे धोक्याचे!

भारतीय संघाने दुसऱ्या डावात लेफ्टी-राईटी जोडी मैदानावर कायम राखण्यासाठी ऋषभ पंत बाद झाल्यावर सर्फराझ खानच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला बढती दिली. सुंदरच्या कौशल्याविषयी शंका नाहीच. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये असा फलंदाजांचा क्रम बदलणे धोक्याचे ठरते. यामुळे सर्फराझचा आत्मविश्वास नक्कीच कमी झाला असेल. तसेच टी-२० व एकदिवसीय प्रकारांत आपण फलंदाजांचा क्रम बदलतो. कसोटीत शक्यतो तसे करू नये, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. तसेच भारताने इंग्लंडप्रमाणे आक्रमक शैलीत खेळून सामना लवकर संपवण्याची घाई करू नये, असेही मांजरेकर आवर्जून म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in