'रोहित भाऊ वडापाव खाणार का?' चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनची भन्नाट रिएक्शन, Video व्हायरल

रोहित जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेजवळ आला तेव्हा चाहत्याने त्याला एक गंमतीशीर प्रश्न विचारला. यावर रोहितने दिलेले उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'रोहित भाऊ वडापाव खाणार का?' चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनची भन्नाट रिएक्शन, Video व्हायरल
photo- X
Published on

जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बुधवारी (दि.२४) विजय हजारे ट्रॉफीतील ९वा सामना मुंबई आणि सिक्कीम यांच्यात खेळला गेला. यावेळी रोहित शर्माला पाहण्यासाठी हजारो चाहते जमले होते. सामन्यात, रोहितने दमदार खेळी केली. त्याच्या खेळलेल्या प्रत्येक शॉट्सला टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, रोहित जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेजवळ आला तेव्हा चाहत्याने त्याला एक गंमतीशीर प्रश्न विचारला. यावर रोहितने दिलेले उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चाहत्याचा अनपेक्षित सवाल… रोहितची भन्नाट रिऍक्शन!

मुंबई आणि सिक्कीम यांच्यातील सामन्यादरम्यान रोहित शर्माचा चाहत्याशी झालेला विनोदी संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामन्यादरम्यान, रोहित शर्मा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना एका चाहत्याने त्याला विचारले, "रोहित भाऊ, वडा पाव खाणार का?"( “रोहित भाई, वडा पाव खाओगे क्या?) दोनदा प्रश्न विचारल्यानंतर, तिसऱ्यांदा रोहितने हात हलवत सभ्यपणे नकार दिला.रोहितची ही साधीशी पण मन जिंकणारी प्रतिक्रिया चाहत्यांना इतकी आवडली की काही सेकंदातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

हिटमॅनचे धमाकेदार कमबॅक अन् मुंबईचा शानदार विजय

दरम्यान, क-गटातील सलामीच्या सामन्यात शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने सिक्कीमचा ८ गडी व ११७ चेंडू राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना सिक्कीमने ५० षटकांत ७ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली. आशिष थापाने ७९ धावांची खेळी साकारली. मुंबईकडून शार्दूलने १९ धावांत २ बळी मिळवले. लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमण करत लढत एकतर्फी केली. ३८ वर्षीय रोहित शर्मा सात वर्षांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये परतला आहे.

रोहितने १८ चौकार व ९ षटकारांसह १५५ धावा फटकावल्या. त्याने ६२ चेंडूंतच शतकाची वेस ओलांडली. त्याचे हे लिस्ट-ए कारकीर्दीतील ३७वे शतक ठरले. रोहित व अंक्रिश रघुवंशी (३८) यांनी १९ षटकांत १४१ धावांची सलामी नोंदवली. अंक्रिश बाद झाल्यावर रोहितने मुशीर खानच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भर घातली. अखेरीस ३०व्या षटकात मुंबईला जिंकण्यासाठी अवघ्या १० धावा शिल्लक असताना रोहित बाद झाला. मग मुशीर (नाबाद २७) व सर्फराझ (नाबाद ८) या खान बंधूंनी ३०.३ षटकांत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह मुंबईने क-गटात अग्रस्थान मिळवले असून त्यांची २६ तारखेला उत्तराखंडशी गाठ पडेल.

logo
marathi.freepressjournal.in