आगामी टी-२० विश्वचषकात रोहितच भारताचा कर्णधार! हार्दिक उपकर्णधारपदी, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची माहिती

जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल
आगामी टी-२० विश्वचषकात रोहितच भारताचा कर्णधार! हार्दिक उपकर्णधारपदी, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची माहिती
Published on

राजकोट : जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हार्दिक पंड्या तंदुरुस्त झाल्यास तो विश्वचषकात उपकर्णधार असेल, हेसुद्धा आता स्पष्ट झाले आहे.

रोहित व विराट कोहली २०२२मध्ये टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ज‌वळपास १४ महिने एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळले नव्हते. मात्र जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेद्वारे या दोघांनीही पुनरागमन केले. १ जूनपासून टी-२० विश्वचषक रंगणार असून रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक भारताचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र तो सध्या दुखापतग्रस्त आहे. तसेच रोहित व विराट यांचे संघात पुनरागमन झाल्याने रोहितच टी-२० विश्वचषकात कर्णधार असेल, याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

“२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात आपले जेतेपद हुकले. मात्र रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने १० सामन्यांत धडाकेबाज कामगिरी केली. आता २०२४च्या टी-२० विश्वचषकात रोहितच्याच कर्णधारपदाखाली आपण नक्कीच विंडीज व अमेरिकेत तिरंगा फडकावू,” असे जय शहा म्हणाले. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नामकरण सोहळ्यादरम्यान जय शहा यांनी भाष्य केले.

विराटशी संवाद साधून लवकरच निर्णय घेऊ!

विराटने भारतासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. सध्या तो विश्रांतीवर असला तरी आगामी टी-२० विश्वचषकात त्याच्या खेळण्याविषयी लवकरच बीसीसीआय व निवड समिती विराटशी संवाद साधेल, असे शहा यांनी सांगितले. तसेच विराटच्या माघारीच्या निर्णयाचा आदर राखावा व याविषयी निष्फळ चर्चा करू नये, असेही त्यांनी सुचवले. याव्यतिरिक्त, २०२५च्या पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने सहभागी व्हायचे की नाही, याविषयीचा निर्णय घेण्यासाठी अद्याप बराच वेळ आहे, असेही जय शहा यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in