इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याला रोहित शर्मा मुकणार, बुमरा भारताचे नेतृत्व करणार

भारत-इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे कसोटी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याला रोहित शर्मा मुकणार, बुमरा भारताचे नेतृत्व करणार

भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या कोरोना चाचणीचा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आल्याने इंग्लंडविरुद्ध शुक्रवारपासून रंगणाऱ्या निर्णायक पाचव्या कसोटीला तो मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहितच्या अनुपस्थितीत आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा भारताचे नेतृत्व करणार आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे कसोटी खेळवण्यात येणार आहे. गतवर्षी उभय संघांतील ही कसोटी खेळण्यापूर्वीच भारतीय संघ कोरोनामुळे मायदेशी परतला होता. भारतीय संघ या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. त्यामुळे या कसोटीकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे. रोहितला रविवारी कोरोनाची लागण झाल्यामुळे तो लीस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीस आला नाही. त्यामुळे रोहितच्या मुख्य लढतीत खेळण्याबाबत संभ्रम कायम होता. अखेर बुधवारी दुसरी टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आल्यामुळे रोहितला या कसोटीतून माघार घ्यावी लागली. भारतीय संघ ७ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामनेसुद्धा खेळणार असून या मालिकेतील रोहितच्या समावेशाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

“रोहितच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला मुकणार असून बुमरा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे,” असे बीसीसीआयने निवेदनात म्हटले. दरम्यान, रोहितच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या साथीने मयांक अगरवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in