
कटक : कर्णधार रोहित शर्माचा शतकी तडाखा आणि रवींद्र जडेजाची गोलंदाजीतील मॅजिक या बळावर भारतीय संघाने रविवारी इंग्लंडला ४ विकेट आणि ३३ चेंडू राखून धूळ चारली. या विजयामुळे ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने दिलेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने धडाकेबाज सुरुवात केली. गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी झगडत असलेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला अखेर सूर गवसला. त्याने शुभमन गिलच्या साथीने इंग्लंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. या सलामीच्या जोडीने १६.४ षटकांत १३६ धावांची धडाकेबाज भागीदारी केली. या धावगतीवरूनच रोहितच्या झंझावाती खेळीचा अंदाज येतो. ५२ चेंडूंत ६० धावा करून गिलच्या खेळीला ब्रेक लागला. वन डाऊन फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने निराश केले. ५ धावांवर तो आदिल राशिदचा शिकार झाला. त्यानंतर रोहित आणि श्रेयस अय्यर यांनी भारताची धावसंख्या पुढे नेली. या दरम्यान रोहितने शतकी बॅट उंचावली. ९० चेंडूंत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने रोहितने ११९ धावांची तुफानी खेळी खेळली. त्याच्या तावडीतून इंग्लंडचे गोलंदाज सुटले नाहीत. आदिल राशिद, गस अॅटकिंसन आणि मार्क वुड यांची रोहितने सालटी काढली. राशिदने १० षटकांत ७८ धावा मोजल्या. त्याला एक विकेट मिळवता आली असली तरी तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. गस अॅटकिंसनने ७ षटकांत ६५ धावा दिल्या. त्याला ९.२८ च्या सरासरीने फटकवले. २९.४ व्या षटकात भारताची धावसंख्या २२० असताना रोहितच्या रुपाने यजमान संघाने तिसरी विकेट गमावली. श्रेयस अय्यर (४७ चेंडूंत ४४ धावा) आणि अक्षर पटेल (४३ चेंडूंत नाबाद ४१ धावा) यांनी भारताच्या विजयात हातभार लावला. ४४.३ षटकांत ६ फलंदाज गमावून भारताने विजयी लक्ष्य गाठले. चांगली सुरुवात केल्याने भारताला विजयी लक्ष्य गाठताना फारसे कष्ट करावे लागले नाहीत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या धडाकेबाज सलामीमुळे इंग्लंडचे गोलंदाज दबावाखाली आले. त्यातून बाहेर निघणे मग पाहुण्या संघासाठी जड होते. गेल्या अनेक महिन्यांपासून रोहित शर्माला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले आहे. कोलंबो येथे ६४ धावांच्या खेळीनंतर रोहितला कोणत्याही फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावता आले नव्हते. मात्र ही कोंडी फोडण्यात आता रोहितला यश आले आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा इंग्लंडच्या फलंदाजांसाठी अडचण ठरला. त्याने १० षटकांत केवळ ३५ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडले. त्यात एका निर्धाव षटकाचा समावेश होता. मात्र तरीही पाहुण्या संघाने ४९.५ षटकांत ३०४ धावांपर्यंत मजल मारली.
फलंदाजांसाठी अनुकूल अशा खेळपट्टीवर सेट झालेल्या फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी जडेजाने केली. बेन डकेट (५६ चेंडूंत ६५ धावा) आणि जो रुट (७२ चेंडूंत ६९ धावा) ही दुकली भारतासाठी अडचण ठरत होती. हे दोन्ही अडथळे जडेजाने दूर केले. या दोघांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. पाहुण्या संघाने ३५ षटकांत ३ फलंदाज गमावून २०० धावा चोपल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड ३३० धावांचा टप्पा सर करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र जडेजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पाहुण्या संघाच्या १५ ते २० धावा कमी केल्या. मधल्या फळीतील हॅरी ब्रुक (५२ चेंडूंत ३१ धावा) आणि कर्णधार जोस बटलर (३५ चेंडूंत ३४ धावा) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. लिअम लिव्हींगस्टोन (३२ चेंडूंत ४१ धावा) आणि आदिल राशिद (५ चेंडूंत १४ धावा) यांनी उपयुक्त खेळी खेळली नसती तर इंग्लंडचा संघ ३०० धावा पार करू शकला नसता. राशिदने मोहम्मद शमीला सलग ३ खणखणीत चौकार ठोकले. २०११ पासून कटक येथील बाराबती स्टेडियमवरील ही सर्वात कमी धावसंख्या होती. ३५० पेक्षा जास्त ही पहिल्या डावातील या स्टेडियमवरील सरासरी धावसंख्या आहे.
सर्वात आधी जडेजाने डकेटला आपल्या सापळ्यात अडकवले. धावांचा भुकेला असलेल्या डकेटला बाहेरच्या चेंडूवर मिड ऑनला हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. त्यानंतर जो रुटचीही जडेजाच्या गोलंदाजीवर फसगत झाली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो पाचव्यांदा जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. डिप एक्स्ट्रा कव्हरला कोहलीकडे झेल देऊन रुट माघारी परतला.
जडेजाने जॅम्मी ओव्हरटोनला बाद करत आपला स्पेल संपवला. तो फटका मारण्यासाठी जागा करण्याचा प्रयत्न करत होता, पण कव्हरला शुभमन गिलकडे झेल देऊन ओव्हरटोनच्या खेळीला ब्रेक लागला.
हर्षित राणा या सामन्यात महागडा ठरला. त्याने ९ षटकांत ६२ धावा मोजत १ विकेट मिळवली.
इंग्लंडने पहिल्या १० षटकांत नाबाद ७५ धावा तडकावल्या. ८१ धावांवर नाबाद असलेला पाहुणा संघ १०२ धावांवर २ फलंदाज बाद अशा स्थितीत होता. रुट आणि ब्रुक ही जोडी मैदानात होती. धावांचा वेग कमी करण्याची भारतासमोर ही चांगली संधी होती. मात्र ही जोडी स्ट्राईक रोटेट करत होती. प्रत्येक षटकात ६ धावा या प्रमाणे धावफलक हलत होते.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : ४९.५ षटकांत ३०४ धावांवर सर्वबाद (बेन डकेट ६५ धावा, जो रूट ६९ धावा, लियाम लिव्हिंगस्टोन ४१ धावा; रवींद्र जडेजा ३/३५)
भारत : ४४.३ षटकांत ३०८/६ (रोहित शर्मा ११९ धावा, शुभमन गिल ६० धावा, श्रेयस अय्यर ४४ धावा, ओव्हरटोन २/२७)