
मुंबई : तब्बल १० वर्षांनी रणजीच्या रणांगणात परतणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (१९ चेंडूंत ३ धावा) सपशेल अपयशी ठरला. रोहितसह भारताच्या तारांकित खेळाडूंनी सजलेली मुंबईची फलंदाजी जम्मू आणि काश्मीरविरुद्ध ढेपाळली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा पहिला डाव ३३.२ षटकांत १२० धावांतच संपुष्टात आला.
वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार अकादमीच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या अ-गटातील या लढतीत पहिल्या दिवसअखेर जम्मूने ४२ षटकांत ७ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली आहे. जम्मूने पहिल्या डावात तूर्तास ५४ धावांची निर्णायक आघाडी मिळवली असून कर्णधार पारस ड्रोगा १९, तर युधवीर सिंग २ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे आता शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मुंबईचे गोलंदाज जम्मूचे अखेरची तीन बळी किती लवकर बाद करणार, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच दुसऱ्या डावात मुंबईच्या फलंदाजांवरही मोठी धावसंख्या उभारण्याचे दडपण असेल.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसताना बीसीसीआयने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याची सक्ती सर्व खेळाडूंना लागू केली आहे. रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून देशभरात प्रारंभ झाला. यापूर्वी नोव्हेंबर २०१५मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रोहित अखेरचा रणजी सामना खेळला होता. तसेच तीन महिन्यांत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे रणजी स्पर्धेद्वारे लय मिळवण्याचे त्याचे लक्ष्य होते.
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताच मैदानात जमलेल्या मोजक्या चाहत्यांनी जल्लोष केला. तारांकित खेळाडू परतल्यामुळे आयुष म्हात्रे आणि सिद्धेश लाड यांना मुंबईच्या संघात स्थान लाभले नाही. रोहित आणि यशस्वी जैस्वाल यांच्या रूपात तगडी सलामी जोडी मुंबईकडून सलामीला उतरली. मात्र वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईच्या अंगलट आला. तिसऱ्याच षटकात अकीब नबीने यशस्वीला ४ धावांवर पायचीत पकडले. दुसऱ्या बाजूने रोहितचाही संघर्ष सुरू होता. अखेर उमर नाझीरच्या उसळी घेणाऱ्या चेंडूला लेग-साइडला खेळताना रोहितचा उडालेला झेल पारसने टिपला. रोहितने १९ चेंडूंत अवघ्या ३ धावा केल्या. नाझीरने रोहितला बाद केल्यावर जल्लोष करणे मात्र टाळले.
सहा षटकांतच सलामीवीर माघारी परतल्याने मुंबईच्या अन्य फलंदाजांवर दडपण आले. परिणामी कर्णधार रहाणे (१२), हार्दिक तामोरे (७), शिवम दुबे (०) आणि शम्स मुलाणी (०) यांनीही तंबूचा रस्ता धरला. नाझीर व नबी यांचा स्पेल संपल्यावर युधवीरनेसुद्धा मुंबईच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. श्रेयस अय्यरने ७ चेंडूंत ११ धावा फटकावून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र युधवीरने त्याचा अडसर दूर करून मुंबईची पहिल्या तासभरात ७ बाद ४७ अशी केविलवाणी अवस्था केली. येथून मग शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन या अखेरच्या भरवशाच्या जोडीने मुंबईला सावरले. विशेषत: शार्दूलने आक्रमण करताना ५ चौकार व २ षटकार लगावले. तनुषने एकेरी-दुहेरी धावा काढून त्याला साथ दिली. त्यामुळे मुंबईने उपहाराला ७ बाद ११० धावांपर्यंत मजल मारली. त्यावेळी या दोघांनी आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भर घातली होती.
मात्र दुसऱ्या सत्रातील पहिल्याच षटकात नबीने तनुषला २६ धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात मोहित अवस्थीही परतला. शार्दूलने तळाच्या कर्श कोठारीच्या साथीने १० धावांची भर घालून झुंजार अर्धशतक साकारले. अखेर युधवीरलाच मोठा फटका खेळण्याच्या नादात शार्दूल बाद झाला आणि मुंबईचा डाव १२० धावांवर आटोपला.
जम्मू आणि काश्मीरची सुरुवातही खराब झाली. मोहितने विव्रांत शर्माला (४) बाद केले. मात्र स्लीपमध्ये सुटलेल्या झेलचा लाभ घेत शुभम खजुरियाने (५३) अर्धशतक साकारले. आबिद मुश्ताकने ३७ चेंडूंत ४४ धावा फटकावून जम्मूला १०० धावांचा पल्ला गाठून दिला. मोहितनेच आबिदचा अडसर दूर केला, तर फिरकीपटू शम्सने शुभमला बाद केले. मात्र जम्मूने पहिल्या दिवसअखेर ७ बाद १७४ धावा करून ५४ धावांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे त्यांचे तळाचे फलंदाज अधिकाधिक धावांची भर घालण्यास उत्सुक असतील.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ३३.२ षटकांत सर्व बाद १२० (शार्दूल ठाकूर ५१, तनुष कोटियन २६; उमर नाझीर ४/४१, युधवीर सिंग ४/३१)
जम्मू आणि काश्मीर (पहिला डाव) : ४२ षटकांत ७ बाद १७४ (शुभम खजुरिया ५३, आबिद मुश्ताक ४४; मोहित अवस्थी ३/३४)
एमसीएकडून अतिरिक्त आसनांची सुविधा
रोहित, यशस्वी, श्रेयस, रहाणे असे भारतीय संघातील फलंदाज रणजी स्पर्धेत बऱ्याच कालावधीनंतर मुंबईकडून खेळत असल्याने एमसीएने या सामन्यासाठी आसनांची संख्या वाढवली होती. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजी घेतल्याचे समजल्यावर स्टेडियमबाहेर काही चाहत्यांनी गर्दीसुद्धा केली. मात्र रोहित व यशस्वी बाद झाल्यावर अनेकांनी परतीचा रस्ता पकडला. आता दुसऱ्या डावात रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते पुन्हा बीकेसीकडे परततील, अशी अपेक्षा आहे.
गिल, पंतकडूनही निराशा; जडेजाचे ५ बळी
एकीकडे मुंबईत फलंदाज अपयशी ठरत असताना दुसऱ्या बाजूला शुभमन गिल, ऋषभ पंत हे भारतीय तारेही फिके पडले. पंजाबकडून खेळताना गिल अवघ्या ४ धावांवर बाद झाला. पंजाबचा संघ कर्नाटकविरुद्ध फक्त ५५ धावांत गारद झाला. दुसरीकडे दिल्लीकडून खेळणारा पंत पहिल्या डावात १० चेंडूंत फक्त १ धाव काढून माघारी परतला. दिल्लीचा संघ सौराष्ट्रविरुद्ध १८८ धावांत गारद झाला. अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने ५ बळी मिळवले. तसेच फलंदाजीतही जडेजाने ३६ चेंडूंत ३८ धावांचे योगदान दिल्याने सौराष्ट्रने पहिल्या दिवसअखेर ५ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली.
रोहितला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील गेल्या सहा सामन्यांत एकदाही २० पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. न्यूझीलंड संघाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये पहिल्या कसोटीत रोहितने अखेरचे अर्धशतक झळकावले होते.