
क्रीडा प्रतिनिधी/मुंबई
अखेर दशकभराच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गुरुवारी रणजीच्या रणांगणात परतणार आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील अ-गटात मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर यांच्यातील लढत बीकेसी येथील शरद पवार अकादमीच्या मैदानावर खेळवण्यात येईल. ३७ वर्षीय रोहितसह मुंबईकडून खेळणाऱ्या अनेक तारांकित खेळाडूंवर या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांचे लक्ष असेल.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसताना बीसीसीआयने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याची सक्ती सर्व खेळाडूंना लागू केली आहे. त्यामुळे आता रोहित तब्बल १० वर्षांनी मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतच रोहितने रणजी स्पर्धेत खेळणार असल्याचे जाहीर केले होते. यापूर्वी नोव्हेंबर २०१५मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रोहित अखेरचा रणजी सामना खेळला होता.
गेल्या तीन महिन्यांत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित सपशेल अपयशी ठरला. रोहितला ८ कसोटींमध्ये फक्त १६४ धावाच करता आल्या. भारताचे अन्य फलंदाजही या काळात संघर्ष करत होते. मात्र रोहितच्या कसोटी संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सिडनीतील पाचव्या कसोटीत रोहितने स्वत:हून संघाबाहेर राहण्याचा निर्णयही घेतला. तरी कसोटीतून निवृत्ती पत्करण्याचा आपला मुळीच विचार नाही, असे रोहितने त्यावेळी स्पष्ट केले. आता २३ ते २६ जानेवारी या कालावधीतील लढतीत खेळून रोहित लय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
तसेच ३० जानेवारीपासून मुंबईची मेघालयविरुद्ध लढत होणार आहे. या सामन्यातही रोहित खेळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. रणजी स्पर्धेतील साखळी सामने ४ दिवसांचे असतात. त्यामुळे ही लढत २ फेब्रुवारीपर्यंत लांबू शकते. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होणार असून मालिकेच्या किमान ३-४ दिवसांपूर्वी भारतीय संघ नागपूरला रवाना होणे अपेक्षित आहे. आठवडाभराच्या कालावधीतच लाल आणि पांढऱ्या चेंडूचे सामने खेळण्यासाठी आम्ही खेळाडू मानसिकदृष्ट्या तयार असतो, असेही रोहितने सांगितले होते.
दरम्यान, रोहित परतला असला तरी मुंबईचे नेतृत्व मात्र अजिंक्य रहाणेच करणार आहे. गतवर्षी अजिंक्यच्याच नेतृत्वाखाली मुंबईने ४२व्यांदा रणजी करंडक उंचावला होता. तसेच यशस्वी जैस्वालला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने तो या रणजी सामन्यात खेळणार आहे. श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर असे भारतीय संघाकडून खेळलेले खेळाडू या संघाचा भाग असतील. आयुष म्हात्रे, तनुष कोटियन, शम्स मुलाणी यांच्याकडेही लक्ष असेल. सर्फराझ खान मात्र पाठीच्या दुखापतीमुळे दोन्ही रणजी सामन्यांना मुकणार आहे.
पारस डोग्रा जम्मूचे नेतृत्व करणार असून या संघात अब्दुल समद, उमरान मलिक असे प्रतिभावान खेळाडू आहेत. सकाळी ९.३० वाजता सामन्याला प्रारंभ होणार असून मर्यादित प्रेक्षकक्षमता असलेल्या बीकेसीतील या मैदानावर चाहते रोहितला पाहण्यासाठी गर्दी करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने खुर्च्यांची संख्या वाढवल्याचे समजते.
मुंबईचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे, आकाश आनंद, तनुष कोटियन, शम्स मुलाणी, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डीसोझा, रॉयस्टन डायस, कर्श कोठारी.
रोहितच्या समावेशामुळे सर्वांना प्रेरणा : रहाणे
“रोहित किती वर्षांनी रणजी सामना खेळत आहे, हे महत्त्वाचे नाही. तर त्याच्यामध्ये अद्यापही भूक कायम आहे, हे महत्त्वाचे आहे. रोहितला मी किंवा अन्य कुणीही काही सांगण्याची गरज नाही. गेले दोन दिवस रोहितने नेटमध्ये उत्तम सराव केला आहे. मेघालयविरुद्धच्या लढतीसाठी तो उपलब्ध असेल की नाही, हे आता सांगणे कठीण आहे. मात्र आगामी सामन्यात रोहित नक्कीच छाप पाडेल. त्याच्या समावेशामुळे संघातील खेळाडूंची उर्जा आणखी वाढली असून सर्वांना प्रेरणा मिळाली आहे,” अशा शब्दांत मुंबईचा कर्णधार रहाणेने रोहितचे महत्त्व अधोरेखित केले.
पहिल्या टप्प्यानंतर स्थिती कशी?
- ११ ऑक्टोबरपासून रणजी स्पर्धेला सुरुवात झाली. १६ नोव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा खेळवण्यात आला. या कालावधीत सर्व संघ प्रत्येकी पाच सामने खेळले. यंदा प्रथमच दोन टप्प्यांत रणजी स्पर्धा खेळवण्यात आली.
- ३८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी ८ संघांचे ४ एलिट गट, तर उर्वरित ६ संघांचा प्लेट गट तयार करण्यात आला आहे. एलिट गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
- अ-गटात असलेला मुंबईचा संघ ५ सामन्यांतील ३ विजय, १ अनिर्णित लढत आणि १ पराभवाच्या एकूण २२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. बडोदा २७ गुणांसह पहिल्या, तर जम्मू २३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईचे दोन्ही शिल्लक सामने घरच्या मैदानातच होणार असले, तरी त्यांना आगेकूच करण्यासाठी या दोन्ही लढती जिंकणे गरजेचे आहे.