
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावल्याचा फायदा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला होणार असल्याचे दिसते. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत रोहितकडेच भारतीय संघाचे नेतृत्व राहण्याची दाट शक्यता असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली. २० जूनपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यातील संघाच्या निवडीबाबत निवडकर्त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र रोहितच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडने मायदेशात भारताचा लाजिरवाणा पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर- गावस्कर मालिका भारताने १-३ ने गमावली. या मालिकेत रोहितने निराश केले. त्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहितवर दबाव होता. मात्र हा दबाव झुगारून रोहित सेनेने विजेतेपदाचा टिळा आपल्या माथी लावला.
असे असले तरी एकदिवसीय फॉरमॅटमधील यशाचा विचार कसोटी संघ निवड करताना राष्ट्रीय निवड समिती करेल का? हाही प्रश्न आहे.
गेल्या डब्ल्यूटीसीच्या कालावधीत भारताला सहा लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद होते. परंतु सिडनी येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या कसोटीत त्याने संघाबाहेर राहणे पसंत केले होते. बरेच खेळाडू अनफॉर्मशी झुंजत असल्याने त्याने हा निर्णय घेतला होता.
ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघाने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे संघातील नेतृत्वात बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते. तसेच मी कसोटी सामना खेळणार नाही, असे रोहित केव्हाही म्हणालेला नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले.
अलिकडच्या काही कसोटी मालिकांमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने निराश केले आहे. तसेच रोहितनेही आपल्या फलंदाजीत खराब कामगिरी केली. त्याचा फटका संघाच्या कामगिरीवर होत होता. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या संघांनी भारताला धूळ चारली. त्यामुळे संघाचा कर्णधार रोहित शर्मावर टिकेची झोड उठली. अनेकांनी रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितने निवृत्ती घ्यावी अशी मागणी घेतली होती. दरम्यान रोहितने याबाबत स्वत: खुलासा करत टिकाकारांची तोंडे बंद केली. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपदाचा चषक उंचावला. या स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये मी खेळत राहणार असे रोहितने सांगितले.
प्रशिक्षकांचा दृष्टिकोनही महत्त्वाचा ठरेल
इंग्लंड मालिकेसाठी संघ निवडीबाबत राष्ट्रीय निवड समितीने अद्याप तरी निर्णय घेतलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आयपीएलमुळे निवड समिती वेट अँड वॉचवर आहे. हे सामने पाहिल्यानंतर खेळाडूंचा फॉर्म निवडकर्त्यांना कळेल, असे सूत्रांनी सांगितले. आयपीएल सुरू झाल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संघ निवडीला सुरूवात होऊ शकते. या निवडीसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा दृष्टिकोनही महत्त्वाचा असेल, असे सूत्रांनी सांगितले.