रोहित, विराटचे पुनरागमन: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; बुमरा, जडेजा यांना विश्रांती

रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.
रोहित, विराटचे पुनरागमन: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी 
भारतीय संघाची घोषणा; बुमरा, जडेजा यांना विश्रांती
Published on

मुंबई : टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र आता रोहित आणि विराट कोहली यांनी जवळपास वर्षभरानंतर भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केले आहे. मायदेशात ११ जानेवारीपासून रंगणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी संध्याकाळी मुंबईत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यासाठी बराच विलंब झाला होता, त्यामुळे निवड समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रोहित, विराटच्या समावेशाविषयी अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समिती काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रोहित आणि विराटच्या निवडीमागे महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सूत्रांकडून समजते.

रोहित शर्माकडेच भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरसाठीही टी-२० संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. यजुर्वेंद्र चहल, आणि आर अश्विन यांना संधी मिळालेली नाही. फिरकीची जबाबदारी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्याकडे आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला जात आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. आता हे दोघेच दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाहीत. रोहित आणि विराट हे नोव्हेंबर २०२२मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर एकही टी-२० सामना खेळलेले नाहीत. या दोघांनीही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि २०२३ वनडे वर्ल्डकपसाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले होते. या दोघांची निवड झाल्यामुळे आता त्यांचा टी-२० वर्ल्डकपमध्ये समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेले वर्षभर म्हणजेच २०२२च्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर हार्दिक पंड्याने भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. २०२३च्या वनडे वर्ल्डकपमध्ये हार्दिक पंड्याचा घोटा दुखावल्यानंतर सूर्यकुमारकडे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. सूर्यकुमारने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत तसेच डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. अफगाणिस्तानविरुद्धचे तीन टी-२० सामने मोहाली (११ जानेवारी), इंदूर (१४ जानेवारी) आणि बंगळुरू (१७ जानेवारी) येथे होणार आहेत. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून हैदराबाद येथून सुरुवात होईल. विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला येथे अन्य चार कसोटी सामने होतील.

भारताचा टी-२० संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्णोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार

logo
marathi.freepressjournal.in