

https://www.instagram.com/p/DQQzIDVDIHq/सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या संघातील स्थानाविषयी शंका उपस्थित करणे चुकीचे आहे. दोघांनीही गेली १५ वर्षे सातत्याने भारताला विजय मिळवून दिले आहेत. त्यांच्या अनुभवाचा मलाही लाभ होत आहे, असे मत भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केले.
गिलच्या नेतृत्वात खेळताना भारताने शनिवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला ९ गडी व ६९ चेंडू राखून सहज धूळ चारली. रोहित व विराट हे अनुभवी फलंदाज या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी जणू देशभरातील तमाम चाहत्यांना दिवाळीचे रिटर्न गिफ्ट देताना दीडशतकी भागीदारी रचली. रोहितने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ५०वे शतक साकारताना १२५ चेंडूंत नाबाद १२१ धावा केल्या, तर विराटने ८१ चेंडूंत नाबाद ७४ धावा फटकावताना ७५वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. शतकवीर रोहितला ३ सामन्यांत २०२ धावा केल्यामुळे मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाला भारताने ४६.४ षटकांत २३६ धावांत गुंडाळले. मग रोहित-विराटच्या १६८ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताने ३८.३ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. विशेषत: विराट सलग दोन लढतींमध्ये शून्यावर बाद झाला होता. तसेच २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी मालिकेपूर्वी या दोघांच्याही संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र तूर्तास दोघांनी आठवणींना उजाळा देणारी भागीदारी साकारून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. व टीकाकारांची तोंडे बंद केली. त्यामुळे भारताने मालिका १-२ अशी गमावली असली, तरी रोहित-विराटला गवसलेला सूर व मालिकेचा शेवट गोड केल्यामुळे चाहते आनंदी आहेत. आता ३० नोव्हेंबरपासून भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची पुढील एकदिवसीय मालिका होईल.
“रोहित-विराट यांना एकत्रित खेळताना पाहणे नेहमीच आनंदाचे असते. त्यांच्या एकदिवसीय संघातील स्थानाविषयी सर्व जण का चर्चा करत आहेत, हे मला कळलेले नाही. दोघांनीही गेल्या १५ वर्षांत भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. त्या दोघांच्या मैदानात असण्याने मला कर्णधार म्हणूनही फार लाभ होत आहे,” असे गिल म्हणाला.
“आम्ही मालिका गमावली असली, तरी याद्वारे काही सकारात्मक बाबीही समोर आल्या आहेत. आता रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील. त्यानंतर संघ व्यवस्थापन दोघांशी संवाद साधणार असून गरज वाटल्यास दोघेही नक्कीच विजय हजारे स्पर्धेतही खेळताना दिसतील,” असेही गिलने सांगितले.
रोहित आणि विराट हे दोन्ही तारांकित खेळाडू एकदिवसीय मालिकेद्वारे तब्बल सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले. त्यामुळे या दोघांच्याच कामगिरीकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून होते. दोघेही मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताकडून अखेरचे खेळले होते. रोहितच्या नेतृत्वात भारताने ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर मे महिन्यात प्रथम रोहितने, मग विराटने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यातच आता २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याच्या हेतूने आता ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय गिलकडे सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रंगेल. त्यानंतर थेट ११ जानेवारीला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पुढील एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र याच दरम्यान २४ डिसेंबरपासून विजय हजारे करंडक ही देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे.
त्यामुळे रोहित-विराट यांनी लय कायम राखण्यासह क्रिकेटशी जुळून राहण्यासाठी विजय हजारे स्पर्धेत सहभागी व्हावे, असे अनेक चाहत्यांसह क्रिकेट तज्ज्ञांनी सुचवले आहे. दोन्ही खेळाडू शक्य झाल्यास विजय हजारे स्पर्धेतील ३ सामने खेळू शकतात. गतवर्षी रोहित-विराट रणजी स्पर्धेतही आपापल्या शहराकडून एक सामना खेळले. त्यामुळे ते आता विजय हजारेमध्ये सहभागी होणार का, याकडे लक्ष असेल. त्यानिमित्ताने चाहत्यांचा देशांतर्गत स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद लाभेल.
हर्षित आठव्या स्थानासाठी उपयुक्त!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात हर्षित राणाने १८ चेंडूंत २४ धावा केल्या. तर तिसऱ्या लढतीत वेगवान गोलंदाजीच्या बळावर ४ बळी मिळवले. त्यामुळे गिलने हर्षितचे विशेष कौतुक करताना तो भविष्या आठव्या स्थानासाठी उपयुक्त पर्याय असल्याचे सांगितले. “आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असावी, यास संघ व्यवस्थापनाचे प्राधान्य आहे. त्यामुळेच अष्टपैलूंना संधी देण्यात येत आहे. मात्र हर्षितने दुसऱ्या लढतीत आठव्या क्रमांकावर छाप पाडली. जर त्याने असेच किमान १५-२० धावांचे योगदान दिले, तर यामुळे आठव्या स्थानाची चिंता मिटेल. तसेच एक अतिरिक्त गोलंदाजही खेळवता येईल,” असे गिल म्हणाला. त्यामुळे भविष्यातही हर्षित आठव्या स्थानी खेळताना दिसू शकतो.
श्रेयस चार आठवडे क्रिकेटपासून दूर
भारताच्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर डाव्या बाजूच्या बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे किमान ४ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा स्थितीत ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपर्यंत श्रेयस तंदुरुस्त होईल की नाही, याविषयी साशंका आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी झालेल्या तिसऱ्या लढतीत ३४व्या षटकात कॅरीचा पाठच्या बाजूने धावत उलटा झेल घेताना श्रेयसला दुखापत झाली. त्याने झेल उत्तम घेतला, मात्र यावेळी जमिनीवर जोरात आपटल्याने श्रेयसला मैदान सोडावे लागले. श्रेयस सध्या फक्त भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग आहे. तसेच पाठदुखीमुळे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटपासून (४-५ दिवसीय सामने) सहा महिने दूर राहण्याचे ठरवले आहे. अशा स्थितीत आता तो थेट नोव्हेंबरमध्येच आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसू शकेल.