
म्युनिक : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पोर्तुगालने रविवारी मध्यरात्री दुसऱ्यांदा नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद काबिज केले. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने गतविजेत्या स्पेनवर २-२ (५-३) असा थरारक विजय मिळवला. याबरोबरच त्यांनी २०२६च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपली तयारी जोरात सुरू असल्याचे एकप्रकारे पोर्तुगालने जाहीर केले. या लढतीकडे ४० वर्षीय रोनाल्डो आणि १७ वर्षीय लामिन यमाल यांच्यातील जुगलबंदी म्हणूनही पाहिले जात होते. मात्र यामध्ये अखेरीस रोनाल्डोनेच बाजी मारली.
युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (यूईएफए) म्हणजेच युरोपातील देशांमध्ये दर दोन वर्षांनी खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे यंदा हे चौथे पर्व होते. यापूर्वी २०१८-१९मध्ये पोर्तुगाल, २०२०-२१मध्ये फ्रान्स, २०२३-२३मध्ये स्पेनने विजेतेपद पटकावले होते. पोर्तुगालने यंदा दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. तर स्पेन सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल झाला होता. तसेच गतवर्षी स्पेनने युरो चषकाचेही जेतेपद मिळवले होते. अशा स्थितीत त्यांनाच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
म्युनिक येथील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने झोकात सुरुवात करताना मार्टिन झुबीमेंडीच्या २१व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर आघाडी घेतली. मात्र नुनो मेंडीसने २६व्या मिनिटालाच पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत बरोबरी कायम राहणार असे वाटले. मात्र ४५व्या मिनिटाला मिकेल ओयराझबलने स्पेनसाठी अप्रतिम गोल नोंदवून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात मग पोर्तुगालने बरोबरीसाठी सर्वस्व अर्पण केले. अखेरीस रोनाल्डोने ६१व्या मिनिटाला पोर्तुगालला पुन्हा बरोबरी साधून दिली. ८०व्या मिनिटाला रोनाल्डोला सबआऊट करण्यात आले. त्यावेळी चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर ९० मिनिटांसह आणि अतिरिक्त वेळेतही (एक्स्ट्रा टाइम) २-२ अशी बरोबरी कायम राहिली. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करावा लागला. त्यामध्ये मग पोर्तुगालने बाजी मारली. मेंडिस स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
शूटआऊटमध्ये काय घडले?
शूटआऊटमध्ये पोर्तुगालचा अनुभवी दिएगो कॉस्टा आणि स्पेनचा कर्णधार उनाई सिमॉन यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तसेच मैदानाबाहेरून सामना पाहणारा रोनाल्डोही सातत्याने हात जोडून, डोळे मिटून देवाची प्रार्थना करताना आढळला. पोर्तुगालकडून पहिल्या तीन प्रयत्नांत गोन्सालो रामोस, विटिन्हा आणि ब्रुनो फर्नांडीस यांनी गोल केले. तर स्पेनकडून मिकेल मेरीनो, बेकेना आणि इस्को यांनी गोलजाळ्याचा वेध घेतला. पोर्तुगालसाठी मेंडीसने चौथा शूट साधला. मात्र स्पेनच्या अल्वारो मोराटाचा प्रयत्न कोस्टाने थोपवला. अखेरीस रुबेन नेवेसने पोर्तुगालसाठी पाचव्या शूटवरही गोल नोंदवून विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. यावेळी रोनाल्डोलाही भावनांवर नियंत्रण राखणे कठीण गेले आणि त्याच्यासह सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला.