रूट मोबाईल संघाची अंतिम फेरीत धडक! आयुष वर्तकची अष्टपैलू चमक; मुंबई पोलीस ब-संघावर मात

बंगळुरु येथील १९ वर्षाखालील नॅशनल क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या आयुषने ३७ धावांत चार बळी मिळवत मुंबई पोलिसांना चांगलेच त्रासावले. हितेश आणि दिनारने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
रूट मोबाईल संघाची अंतिम फेरीत धडक! आयुष वर्तकची अष्टपैलू चमक; मुंबई पोलीस ब-संघावर मात

ठाणे : चार विकेटसह नाबाद ६९ धावांची खेळी करत आयुष वर्तकने रूट मोबाईल संघाला ४८व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील अ-गटाच्या अंतिम फेरीचा मार्ग मोकळा करून दिला. उपांत्य फेरीच्या सामन्यात रूट मोबाईल संघाने मुंबई पोलीस ब-संघावर सहा विकेट्सनी विजय मिळवत निर्णायक फेरीत स्थान मिळवले.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय रूट मोबाईल संघासाठी फायदेशीर ठरला. आयुषची अचूक टप्प्यावरील गोलंदाजी आणि त्याला चांगली साथ देणाऱ्या हितेश परमार, दिनार गावकरच्या माऱ्यासमोर मुंबई पोलिसांनी १४७ धावांवर आपल्या बॅटी म्यान केल्या. संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून देताना अनुज गिरीने सर्वाधिक ५२ धावा केल्या. तन्मय गावकरने १४ धावा केल्या. बंगळुरु येथील १९ वर्षाखालील नॅशनल क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या आयुषने ३७ धावांत चार बळी मिळवत मुंबई पोलिसांना चांगलेच त्रासावले. हितेश आणि दिनारने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

या छोट्या आव्हानाला सामोरे जाताना तीन फलंदाज अवघ्या १८ धावांवर माघारी आल्यामुळे रूट मोबाईलचे नेटवर्क डळमळीत झाले होते. पण अथर्व काळे आणि आयुषने चौथ्या विकेटसाठी १३१ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाला विजयाच्या दिशेने नेले.अथर्वने ४९ धावांची खेळी केली. मुंबई पोलिसांच्या अतुल मोरेने दोन, साईप्रसाद हिंदळेकर आणि तन्मय मयेकरने प्रत्येकी एक गडी बाद केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in