बंगळुरू-कोलकातामध्ये आज कडवी झुंज अपेक्षित; विराट-गंभीर यांच्यातील जुगलबंदीकडेही लक्ष

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलतानाने पहिल्या लढतीत हैदराबादवर सरशी साधली. यंदा गंभीर-चंद्रकांत पंडित यांच्या रूपात अनुभवी प्रशिक्षकांची फळी कोलकाताकडे असून संघातील असंख्य खेळाडू लयीतही आहेत
बंगळुरू-कोलकातामध्ये आज कडवी झुंज अपेक्षित; विराट-गंभीर यांच्यातील जुगलबंदीकडेही लक्ष

बंगळुरू : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारी रंगणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. बंगळुरूचा तारांकित फलंदाज विराट कोहली आणि कोलकाताचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यातील जुगलबंदीसुद्धा चाहत्यांना या निमित्ताने पाहायला मिळेल. त्याशिवाय समाज माध्यमांवर या लढतीला ‘केजीएफ’ (कोहली, ग्लेन, फॅफ) विरुद्ध ‘आरआरआर’ (रिंकू, रसेल, राणा)’ असेही स्वरूप लाभले आहे.

विराट आणि गंभीर यांच्यात मैदानात अनेकदा खटके उडाल्याचे क्रीडाप्रेमींनी यापूर्वी पाहिले आहे. गतवर्षी गंभीर लखनऊ संघासोबत असतानाही एका लढतीनंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यात आता गंभीर कोलकाताकडे परतल्याने या दोघांमधील लढत आणखी रंगतदार होईल. बंगळुरूचा ४९ धावांचा नीचांक हा कोलकाताविरुद्धच नोंदवला गेला आहे. चेन्नईविरुद्ध पहिली लढत गमावल्यानंतर पंजाबविरुद्ध दुसरा सामना जिंकणाऱ्या बंगळुरूला कोलकाताला नमवण्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागेल. मात्र घरच्या मैदानावर खेळताना चाहत्यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतो.

दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलतानाने पहिल्या लढतीत हैदराबादवर सरशी साधली. यंदा गंभीर-चंद्रकांत पंडित यांच्या रूपात अनुभवी प्रशिक्षकांची फळी कोलकाताकडे असून संघातील असंख्य खेळाडू लयीतही आहेत. त्यामुळे २०२१नंतर पुन्हा एकदा कोलकाता बाद फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे गेले असून येथे १८० ते २०० धावाही पुरेशा ठरू शकत नाहीत. दवाचा घटक येथे महत्त्वाचा ठरत असल्याने दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अधिक सोयीचे ठरेल.

आघाडीच्या चौघांवर बंगळुरूची भिस्त

विराट, कणर्धार फॅफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन या चार फलंदाजांवर बंगळुरूची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून आहे. विराटने गेल्या लढतीत अर्धशतक झळकावले. मात्र डू प्लेसिस व मॅक्सवेलला अद्याप छाप पाडता आलेली नाही. त्याशिवाय रजत पाटिदारची अपयशाची मालिका कायम आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक, अनुज रावत यांच्यावर दडपण येत आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज लयीत असून त्याला अल्झारी जोसेफ व यश दयाल यांच्याकडून साथ अपेक्षित आहे. फिरकीपटूंच्या बाबतीत मात्र बंगळुरू संघर्ष करत आहे.

गोलंदाजांची फळी कोलकाताची ताकद

आयपीएलमधील सर्वाधिक महागडा गोलंदाज मिचेल स्टार्कसह सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांचे फिरकी त्रिकुट कोलकाताची ताकद आहे. त्याशिवाय हर्षित राणाने पहिल्याच सामन्यात छाप पाडली आहे. श्रेयसकडून फलंदाजीत योगदान अपेक्षित आहे. मात्र धोकादायक आंद्रे रसेल व रिंकू सिंग यांना रोखण्याचे आव्हान बंगळुरूपुढे असेल. विशेषत: रसेलची कामगिरी बंगळुरूविरुद्ध नेहमीच उंचावलेली आहे. सलामीवीर फिल सॉल्टही फॉर्मात असून नितीश राणा, व्यंकटेश अय्यर यांना सूर गवसल्यास कोलकाताला रोखणे कठीण जाईल.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, करन शर्मा, मनोज भडांगे, मयांक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा, रंजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान.

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, श्रीकर भरत, दुश्मंता चमीरा, हर्षित राणा, वेंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, सुनील नरिन, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, शर्फेन रुदरफोर्ड, चेतन साकरिया, सकिब हुसैन, फिल सॉल्ट, रिंकू सिंग, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

logo
marathi.freepressjournal.in