विराट, कार्तिक यांच्यामुळे बंगळुरूचा रोमहर्षक विजय

चिन्नास्वामी स्टेडियमवरील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ६ बाद १७८ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार शिखर धवनने ३७ चेंडूंत ४५, तर शशांक सिंगने ८ चेंडूंत २१ धावांचे योगदान दिले.
विराट, कार्तिक यांच्यामुळे बंगळुरूचा रोमहर्षक विजय

बंगळुरू : तारांकित फलंदाज विराट कोहलीने (४९ चेंडूंत ७७ धावा) साकारलेल्या अर्धशतकाला अनुभवी दिनेश कार्तिकने (१० चेंडूंत नाबाद २८ धावा) विजयवीराची भूमिका बजावून उत्तम साथ दिली. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाला ४ गडी व ४ चेंडू राखून पराभूत केले. बंगळुरूचा हा दोन सामन्यांतील पहिला विजय ठरला. तर पंजाबला तितक्याच लढतींमध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

चिन्नास्वामी स्टेडियमवरील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ६ बाद १७८ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार शिखर धवनने ३७ चेंडूंत ४५, तर शशांक सिंगने ८ चेंडूंत २१ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. त्यानंतर विराटने आयपीएल कारकीर्दीतील ५१वे, तर टी-२०तील एकंदर १००वे अर्धशतक साकारले. त्याने ११ चौकार व २ षटकार लगावले. मात्र फॅफ डू प्लेसिस (३), कॅमेरून ग्रीन (३), ग्लेन मॅक्सवेल (३) यांनी निराशा केली. विराट माघारी परतल्यावर बंगळुरू संघ संकटात सापडला होता. अशा वेळी कार्तिक व महिपाल लोमरोर (नाबाद १७) यांनी सातव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचून १९.२ षटकांत बंगळुरूचा विजय साकारला. विराटला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. बंगळुरू कोलकाताशी शुक्रवारी पुढील लढत खेळेल.

माझ्यात बरेच टी-२० क्रिकेट शिल्लक!

पंजाबविरुद्धच्या लढतीत सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर विराटने त्याच्यात अद्याप बरेच टी-२० क्रिकेट शिल्लक असल्याचे सांगितले. “सध्या जगभरात टी-२० क्रिकेट पसरवण्याच्या हेतूने माझ्या नावाचा वापर केला जातो, याची मला कल्पना आहे. मात्र मी अद्याप या प्रकाराचे देणे लागतो. गरजेनुसार टी-२० प्रकारात तुम्हाला फलंदाजीत बदल करावे लागतात,” असे विराट म्हणाला. जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात विराटला भारतीय संघात स्थान लाभणार नाही, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्याच अनुषंगाने विराटने ही प्रतिक्रिया दिली असावी.

दोन महिने अनोळखीचे...

पत्नी अनुष्का दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याने विराटने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. जानेवारीत अफगाणिस्तानिविरुद्ध टी-२० सामना खेळल्यावर तो इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी लढतींमध्ये खेळला नाही. यादरम्यान विराट संपूर्ण कुटुंबासह लंडनमध्ये होता. विराट-अनुष्काला फेब्रुवारीत पुत्ररत्न झाले. त्यानंतर आता थेट आयपीएलद्वारे विराट मैदानात परतला. “दोन महिने आम्ही देशात नव्हतो. आम्ही अशा ठिकाणी राहत होतो, जेथे मला त्या भागातील स्थानिक ओळखतही नव्हते. कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी ती जागा योग्य होती. हा दोन महिन्यांचा काळ माझ्यासाठी संस्मरणीय होता,” असे विराटने नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in