बंगळुरूच्या फलंदाजांची गुजरातला भीती; चिन्नास्वामी स्टेडियमवर आज मुकाबला; दोन्ही संघांनाही आव्हान टिकवण्यासाठी विजय अनिवार्य

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.
बंगळुरूच्या फलंदाजांची गुजरातला भीती;  चिन्नास्वामी स्टेडियमवर आज मुकाबला; दोन्ही संघांनाही आव्हान टिकवण्यासाठी विजय अनिवार्य

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. प्रत्येक सामन्यानुसार बाद फेरीची शर्यत अधिक रंगतदार होत आहे. त्यातच शनिवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची माजी विजेत्या गुजरात टायटन्सशी गाठ पडणार आहे. या लढतीत दोन्ही संघांना आव्हान टिकवण्यासाठी विजय अनिवार्य असून गुजरातच्या गोलंदाजांना प्रामुख्याने बंगळुरूच्या फलंदाजीची भीती आहे.

उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील लढतीत गुजरातचे २०० धावांचे लक्ष्य बंगळुरूने १६ षटकांतच पार केले होते. फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूने १० पैकी ३ लढती जिंकल्या असून त्यांचे आ‌व्हान फक्त जर-तर वर टिकून आहे. ६ गुणांसह गुणतालिकेत तळाशी असलेल्या बंगळुरूने आतापर्यंत फक्त पंजाब, हैदराबाद व गुजरात या संघांना नमवले आहे. आता घरच्या मैदानात खेळताना ते आणखी चमकदार कामगिरी करतील, अशी आशा आहे. चिन्नास्वामीवर धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे ठरल्याने येथे पहिल्या डावात २०० धावाही पुरेशा नसतील, असे समजते.

दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातला गेल्या सामन्यात बंगळुरूकडूनच दारुण पराभव पत्करावा लागला. गुजरातने १० पैकी ४ लढती जिंकल्या असून ते सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. हार्दिक पंड्याची झालेली संघबदल व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अनुपस्थिती गुजरातला महागात पडली आहे. आता उर्वरित चार लढती जिंकून ते स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवणार का, हे पाहणे रंजक ठरेल. गुजरातचे फिरकीपटू विरुद्ध बंगळुरूचे फलंदाज असे स्वरूप या लढतीला लाभले आहे.

विराट, जॅक्स भन्नाट लयीत

बंगळुरूच्या विल जॅक्सने गेल्या लढतीत अवघ्या ४१ चेंडूंत शतक झळकावले. त्याशिवाय विराट कोहलीसुद्धा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी टिकून आहे. विराटने १० सामन्यांत ४ अर्धशतके व १ शतकासह तब्बल ५०० धावा केल्या आहेत. डू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून बंगळुरूला मोठी खेळी अपेक्षित आहे. गेल्या काही सामन्यांत दिनेश कार्तिकची बॅट थंडावलेली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा छाप पाडण्यास आतुर असेल. हैदराबाद व गुजरातविरुद्ध तुलनेने बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मोहम्मद सिराजला हळूहळू सूर गवसत असून लेगस्पिनर कर्ण शर्मा त्यांच्यासाठी प्रभावी गोलंदाजी करत आहे. मात्र यश दयाल, लॉकी फर्ग्युसन यांच्याकडून बंगळुरूला सुधारणा अपेक्षित आहे. कॅमेरून ग्रीन त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अष्टपैलू योगदान देण्यास सज्ज आहे.

गिलवर अतिरिक्त भार; रशिदकडे लक्ष

गुजरातची भिस्त फलंदाजीत तरी प्रामुख्याने कर्णधार गिल व डावखुरा साई सुदर्शन यांच्यावर आहे. सुदर्शनने गुजरातसाठी या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक ४१८ धावा केल्या असून त्यानंतर गिलचा (३२० धावा) क्रमांक लागतो. मात्र डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया यांचे अपयश गुजरातला महागात पडत आहे. शाहरूख खानने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावून चुणूक दाखवली. वृद्धिमान साहाऐवजी अन्य एखादा पर्याय ते पडताळून पाहू शकतात. गोलंदाजीत पुन्हा एकदा रशिद खान व नूर अहमद या अफगाणी फिरकी जोडीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल १० क्रमांकात गुजरातचा एकही गोलंदाज नाही, यावरूनच त्यांचा संघर्ष दिसून येतो. मोहित शर्माने गुजरातसाठी १० बळी घेतले आहेत. मात्र मोहितने बंगळुरूविरुद्ध गेल्या लढतीत सपाटून मार खाल्ला होता. त्यामुळे तो काहीसा दडपणाखाली असेल.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यम्सन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर. साईकिशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अझमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरूख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बी. आर. शरथ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, करन शर्मा, मनोज भडांगे, मयांक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा, रंजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान.

logo
marathi.freepressjournal.in