

मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या क्वालिफायर-२ लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. मात्र मुल्लानपूर येथे होणाऱ्या या सामन्यात १५ वर्षीय धडाकेबाज फलंदाज ‘वैभव सूर्यवंशी’चे वादळ रोखण्याचे मुख्य आव्हान गुजरातच्या गोलंदाजांपुढे असेल. एकूणच दोन्ही संघांना अंतिम फेरी खुणावत असल्याने कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागून आहे.
२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम आता बाद फेरीच्या टप्प्यावर आहे. क्वालिफायर-१मध्ये बंगळुरूने गुजरातचा धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली, तर एलिमिनेटर लढतीत राजस्थानने हैदराबादला धूळ चारून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. आयपीएलच्या नियमांनुसार साखळी फेरीच्या अखेरीस आघाडीच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये ‘क्वालिफायर-१’चा मुकाबला रंगतो. या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. ‘क्वालिफायर-१’ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत झालेला संघ ‘क्वालिफायर-२’मध्ये खेळतो. त्यामुळेच आता गुजरातला पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. मात्र त्यांच्या मार्गात वैभवसह राजस्थानच्या संघाचा अडथळा असेल. मुल्लानपूरच्या महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असेल.
३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर महाअंतिम मुकाबला रंगणार आहे. यंदा एलिमिनेटर व क्वालिफायर-२ लढत एकाच स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे क्वालिफायर-१ गमावणाऱ्या गुजरात संघाला अतिरिक्त प्रवास करावा लागला आहे, तर राजस्थानचे खेळाडू मात्र त्याच ठिकाणी राहणार असल्याने ही बाब त्यांच्यासाठी जमेची ठरू शकते. तसेच क्वालिफायर-२ नंतर दोन दिवसांतच अंतिम सामना असल्याने दोन्ही संघांतील खेळाडूंचा कस लागेल.
दरम्यान, रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने साखळी फेरीत १४ पैकी ८ सामने जिंकून चौथ्या स्थानासह बाद फेरी गाठली. मग एलिमिनेटरमध्ये त्यांनी हैदराबादला नमवून अन्य दोन संघांना इशारा दिला. वैभवने २९ चेंडूंत ९७ धावांची घणाघाती खेळी साकारली. एका आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम त्याने नावावर केला असून वेगवान शतकाच्या विक्रमापासून तो अवघ्या ३ धावांनी वंचित राहिला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव १५ सामन्यांत सर्वाधिक ६८० धावांसह अग्रस्थानी आहे. पॉवरप्लेमध्ये बेधडक फलंदाजी आणि मग टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या बळावर या संघाने इथवर मजल मारली आहे.
वैभववरच राजस्थानची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून असली, तरी ध्रुव जुरेल (५०८ धावा), यशस्वी जैस्वाल (४२६) यांनीही छाप पाडली आहे. मधल्या फळीत पराग व दसुन शनका यांच्याकडून योगदान अपेक्षित आहे. तसेच रवींद्र जडेजाही संघर्ष करत आहे. अशा स्थितीत डोनोवन फरेरा व शुभम दुबेवर अखेरच्या षटकांत फटकेबाजीची मदार असेल. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर राजस्थानचे मुख्य अस्त्र असून त्याने आतापर्यंत २४ बळी मिळवले आहेत. तसेच फिरकीपटू यश पुंजा, नांद्रे बर्गर व ब्रिजेश शर्मा अधूनमधून चमक दाखवत आहेत.
दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने १४ सामन्यांतील ९ विजयांच्या १८ गुणांसह दुसऱ्या स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला. मात्र क्वालिफायर-१ लढतीत त्यांनी निराशा केली. आता गुजरातकडे चूक सुधारण्याची संधी असून त्यांना गोलंदाजांकडून तसेच मधल्या फळीकडून योगदानाची गरज आहे. कगिसो रबाडा (२६ बळी), मोहम्मद सिराज यांची वेगवान जोडी व फिरकीपटू रशिद खान गुजरातची ताकद आहे. फलंदाजीत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी असलेला साई सुदर्शन (६५२), गिल (६१८) व जोस बटलर या आघाडीच्या त्रिकुटावर गुजरातची भिस्त आहे. मधल्या फळीत वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर यांच्यात धडाकेबाज फलंदाजी करण्याइतकी क्षमता नसल्याने गुजरात संघर्ष करत आहे. एकंदर लढतीवर पावसाचे सावट नसल्याने रंगतदार लढत अपेक्षित आहे.
ऑरेंज-पर्पल कॅपच्या शिलेदारांमध्ये चुरस
राजस्थान विरुद्ध गुजरात लढतीत ऑरेंज व पर्पल कॅपच्या शर्यतीत टिकून असलेल्या काही खेळाडूंमधील जुगलबंदी पाहायला मिळेल. एकीकडे गुजरातचा कगिसो रबाडा २६ बळींसह पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या, तर राजस्थानचा जोफ्रा आर्चर २४ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच फलंदाजांमध्ये वैभवकडे ६८० धावांसह ऑरेंज कॅप असली, तरी गुजरातचा साई सुदर्शन (६५२) व गिल (६१८) त्याच्यापेक्षा फारसे मागे नाहीत. अशा स्थितीत या खेळाडूंपैकी कोण आपल्या संघासाठी चमक दाखवणार, हे पाहणे रंजक ठरेल. पर्पल कॅपच्या शर्यतीत सध्या बंगळुरूचा भुवनेश्वर कुमार २६ बळींसह अग्रस्थानी आहे, कारण रबाडाच्या तुलनेत त्याची सरासरी चांगली आहे. एकूणच सध्या ऑरेंज व पर्पल कॅपची शर्यतही चुरशीची झाली असल्याने उर्वरित दोन सामन्यांकडे लक्ष लागले आहे.
उभय संघांत आतापर्यंत १० सामने झाले आहेत. त्यांपैकी गुजरातने ७, तर राजस्थानने ३ लढती जिंकल्या आहेत. आकडेवारी गुजरातच्या बाजूने असली, तरी राजस्थानमध्ये गुजरातला धक्का देण्याची क्षमता असल्याने लढत रंगतदार होईल, असे अपेक्षित आहे.
खेळपट्टीचा अंदाज
मुल्लानपूर येथे यंदाच्या हंगामात झालेल्या ४ पैकी ३ सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. येथे खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असली, तरी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २२०हून अधिक धावा केल्या, तर त्यांचा बचावही केला जाऊ शकतो.
हे माहीत आहे का?
यंदाच्या हंगामात उभय संघांत दोन लढती झाल्या. त्यांपैकी पहिल्या लढतीत राजस्थानने अहमदाबाद येथे गुजरातवर ६ धावांनी सरशी साधली, तर गुजरातने जयपूर येथे राजस्थानला ७७ धावांनी धूळ चारली. आता शुक्रवारी उभय संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येतील.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता , थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप