

लखनौ : आयपीएलमध्ये सलग दोन पराभवांमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ बॅकफूटवर गेला असून बुधवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. दुसरीकडे सहा सामन्यांत फक्त दोन विजय मिळवणारा लखनौ सुपर जायंट्स संघही विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक आहे. राजस्थानचा कर्णधार रियान परागचा खराब फॉर्म आणि मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश ही त्यांच्यासाठी सध्या चिंतेची बाब ठरत आहे. राजस्थानने हंगामाची सुरुवात सलग चार विजयांनी केली होती, मात्र गेल्या दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या नऊ धावांत पाच विकेट गमावल्यामुळे त्यांना ५७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंगने केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानच्या हातातून विजय निसटला. कर्णधार परागने सहा डावांत केवळ २० धावांची सर्वोच्च खेळी केली असून त्याने तीन वेळा एकेरी धावसंख्येवर विकेट गमावली आहे.
राजस्थानच्या फलंदाजीची धुरा प्रामुख्याने यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल या अव्वल फलंदाजांवर अवलंबून आहे. अनुभवी रवींद्र जडेजा आणि शिम्रॉन हेटमायर यांना अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. दरम्यान, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी परागचे समर्थन करताना तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मैदानातील क्षेत्ररक्षण हीदेखील राजस्थानसाठी अडचण ठरत असून नांद्रे बर्गरने रिंकू सिंगचा झेल सोडणे गेल्या सामन्यात महागात पडले होते.
दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सलग तीन पराभवांमुळे गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. राजस्थानचा वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याला यशस्वी जैस्वालची चांगली साथ लाभत आहे. यशस्वीने फलंदाजीत सातत्य राखल्यामुळे सलामीच्या या जोडगोळीने अनेक चांगल्या खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे राजस्थानची ही सलामीची जोडी फोडणे लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांसाठी पहिले आव्हान असेल. बाद फेरीच्या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी लखनौला सुरुवातीलाच विकेट्स मिळवावे लागतील.
पंजाब किंग्जविरुद्धच्या गेल्या सामन्यात लखनौच्या गोलंदाजांनी २५४ धावा बहाल केल्या होत्या. प्रियांश आर्य आणि कूपर कोनोली यांच्या दमदार फलंदाजीमुळे पंजाब किंग्जने या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. त्यांनी १८२ धावांची भागीदारी करत लखनौच्या गोलंदाजीवर प्रहार केला होता.
लखनौच्या ताफ्यात आवेश खान, मोहम्मद शमी आणि मणिमारन सिद्धार्थ यांचा समावेश असला तरी ते सध्या महागडे ठरत आहेत. प्रिन्स यादव याने विकेट्स मिळवण्यात सातत्य राखले आहे. फलंदाजीतही आयुष बदोनी आणि मिचेल मार्श यांची जोडी अपयशी ठरली आहे. बदोनीला मिचेल मार्शच्या साथीने सलामीला बढती देण्यात आली, मात्र हा प्रयोगही यशस्वी होऊ शकला नाही. कर्णधार ऋषभ पंत आणि निकोलस पूरन सातत्य राखण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे लखनौला गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर मजल मारायची असेल तर फलंदाजी आणि गोलंदाजीतही सामूहिक कामगिरी साकारावी लागेल.
- लखनौचा फलंदाज आयुष बदोनी याला आयपीएलमध्ये १०० चौकारांचा पल्ला गाठण्यासाठी अद्याप ९ चौकारांची आवश्यकता आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ६४ धावांची गरज आहे. तसेच ५० षटकारांसाठी त्याला अजून ८ षटकार ठोकायचे आहेत.
फिरकीपटूंचे वर्चस्व राहणार
भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी परंपरेने संथ स्वरूपाची राहिली असून, या सामन्यातही फिरकीपटूंचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. या मैदानावर चेंडूला चांगली पकड मिळत असल्याने फिरकीपटूंना मोठी मदत मिळते. तर अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या वेगवान गोलंदाजांसाठीही ही खेळपट्टी पूरक ठरते. इकाना स्टेडियमवर फलंदाजी करणे सुरुवातीपासूनच सोपे नसते. फलंदाजांना खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी खेळपट्टीवर वेळ घालवावा लागतो. खेळपट्टीचे स्वरूप गोलंदाजांना साथ देणारे असले तरी, आयपीएलमधील आतापर्यंतचे निकाल पाहता, या मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांचे पारडे जड राहिले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.
लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.
सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून