

केप टाऊन : अनुभवी ऑफस्पिनर सायमन हार्मरच्या (१६ धावांत ६ बळी) भेदक फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला. निर्णायक तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या १११ धावांत गुंडाळत १७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हार्मरने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत अवघ्या १६ धावांत सहा बळी टिपले. याबरोबरच आफ्रिकेने (७१.४३ टक्के) डब्ल्यूटीसी गुणतालिकेत दुसरे स्थान काबिज केले.
केप टाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८८ धावांचे आव्हान होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी क्रम पूर्णपणे कोलमडला. हार्मरने फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडकवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. संपूर्ण सामन्यात १० बळी मिळवणाऱ्या हार्मरलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले, तर तीन सामन्यांत १९८ धावा करण्यासह १३ बळी मिळवणारा मार्को यान्सेन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
३७ वर्षीय हार्मरने या सामन्यात एकूण १२० धावांत १० बळी मिळवण्याची कामगिरी केली. कसोटी कारकिर्दीत प्रथमच त्याने एका सामन्यात दहा बळी मिळवण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४२९ धावा करत १०० धावांची आघाडी मिळवली होती. त्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३२९, तर दुसऱ्या डावात ३८७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या वियान मल्डर आणि रायन रिकेल्टन यांनी चौथ्या दिवशी शतके झळकावत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर २८८ धावांचे लक्ष्य ठेवणे शक्य झाले.
पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. उपाहारापर्यंतच त्यांची अवस्था ७ बाद ६० अशी झाली होती. त्यानंतरही फलंदाजांना प्रतिकार करता आला नाही आणि संपूर्ण संघ १११ धावांत तंबूत परतला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानेही तीन बळी मिळवत योगदान दिले. या कामगिरीसह त्याने कसोटी कारकीर्दीत ३५० बळींचा टप्पा गाठला.
पराभवानंतर पुनरागमन
मालिकेतील पहिली कसोटी डर्बन येथे खेळवण्यात आली होती. त्यात ऑस्ट्रेलियाने २१४ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत गकेबरहा येथे एक डाव आणि ३१ धावांनी विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या कसोटीतही विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने मालिका आपल्या नावावर केली. २०१८ मधील वादानंतर दक्षिण आफ्रिकेत या दोन्ही संघांमध्ये प्रथमच कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या विजयामुळे आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत कसोटी संघांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पटकावले.