कोबे (जपान) : महाराष्ट्राच्या सचिन सर्जेराव खिलारीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारातील एफ-४६ गटात आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
त्याशिवाय धरमबीरने क्लब थ्रो क्रीडा प्रकारातील एफ-५१ गटात कांस्यपदक मिळवताना भारताला यंदाच्या स्पर्धेत १२ पदकांचा टप्पा गाठून दिला. यात पाच सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारताची जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी भारताने २०२३ मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके जिंकली होती.
सचिनने १६.३० मीटर लांब गोळाफेक करत सुवर्णपदकाची कमाई केली. यासह त्याने आपलाच १६.२१ मीटरचा आशियाई विक्रमही मोडीत काढला. तसेच आता पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे. सचिन हा सांगली जिल्ह्यातील करगणी गावचा असून, त्याचा शालेय जीवनात अपघात झाला, ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. गँगरीनमुळे सचिनने कोपराचे स्नायू गमावले आणि अनेक शस्त्रक्रिया करूनही त्याचा हात बरा झाला नाही. मात्र, गोळाफेकीत एफ-४६ गटात त्याने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे. सचिनने गेल्या वर्षी हांगझो पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णयश संपादन केले होते.
दुसरीकडे, पुरुषांच्या क्लब थ्रो क्रीडा प्रकारातील एफ-५१ गटाच्या अंतिम फेरीत धरमबीरने पाचव्या प्रयत्नात ३३.६१ मीटरचे अंतर गाठत कांस्यपदक मिळवले. सर्बियाचा झेलिको डिमित्रिएविच (३४.२० मीटर) आणि मेक्सिकोचा मारिओ हर्नांडेझ (३३.६२ मीटर) हे अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाचे मानकरी ठरले.
बुधवारी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलने भालाफेकीच्या एफ-६४ प्रकारातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना दुसऱ्यांदा जागतिक सुवर्ण काबिज केले होते.
भारताने एकूण १२ पदकांसह (पाच सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदके) पदकतालिकेतील तिसरे स्थान कायम राखले आहे. अव्वल स्थानी असणाऱ्या चीनच्या नावे १८ सुवर्ण, १६ रौप्य आणि १४ कांस्यपदके, तर दुसऱ्या स्थानावरील ब्राझीलच्या नावे १७ सुवर्ण, आठ रौप्य आणि पाच कांस्यपदके आहेत. ही स्पर्धा तीन दिवस रंगणार आहे.