नायरऐवजी सुदर्शनला संधी? इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात एकमेव बदल अपेक्षित

भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी चौथी कसोटी जिंकणे अनिवार्य आहे.
नायरऐवजी सुदर्शनला संधी? इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात एकमेव बदल अपेक्षित
Published on

मँचेस्टर : इंग्लंडविरुद्ध २३ जुलैपासून रंगणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात किमान एक बदल सुनिश्चित मानला जात आहे. तिसऱ्या क्रमांकावर करुण नायरऐवजी युवा डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला संधी दिली जाऊ शकते. गुरुवारी सुदर्शन करुणच्या तुलनेत अधिक काळ नेटमध्ये सराव करताना आढळला. तसेच फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनीही सुदर्शनशी बराच काळ संवाद साधला.

भारत-इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेत बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला आता मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी चौथी कसोटी जिंकणे अनिवार्य आहे. २५ वर्षीय युवा कर्णधार शुभमन गिल व त्याचे शिलेदार मँचेस्टर येथे कसा खेळ करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीला नेस्तनाबूत करून त्यांचा ३३६ धावांनी धुव्वा उडवला. तिसऱ्या कसोटीत बुमरा संघात परतल्यानंतरही भारताच्या पदरी निराशा पडली. इंग्लंडने भारतावर अवघ्या २२ धावांनी सरशी साधली. भारताला १९२ धावांचा पाठलाग करता आला नाही.

त्यातही ३३ वर्षीय करुणच्या कामगिरीकडे लगेच लक्ष जात आहे. करुणने तीन कसोटींत अद्याप एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्याने अनुक्रमे ०, २०, ३१, २६, ४०, १४ अशा धावा केल्या आहेत. तिसरा क्रमांक महत्त्वाचा असल्याने करुणचे अपयश संघालाही भारी पडत आहे. पहिल्या कसोटीत सहाव्या स्थानी फलंदाजी करणाऱ्या करुणला गेल्या दोन कसोटींमध्ये सुदर्शनच्या जागी तिसऱ्या स्थानी फलंदाजीस पाठवण्यात आले. मात्र तरीही तो फारसा आश्वासक दिसलेला नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीत ३० धावा करणारा २३ वर्षीय सुदर्शन चौथ्या कसोटीसाठी संघात परतू शकतो. याव्यतिरिक्त संघात फारसा बदल अपेक्षित नाही.

दरम्यान, इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौरे केले. मात्र त्यांना यश लाभले नाही. २०२१-२२मध्ये भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यावेळी काही सामन्यांत विराट, तर काही सामन्यात बुमरा भारताचा कर्णधार होता. त्यामुळे यावेळी भारताला १८ वर्षांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची उत्तम संधी असून गिल आणि कंपनी यामध्ये यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

षटकांच्या संथ गतीसाठी इंग्लंडला दंड

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत षटकांची गती संथ राखल्याबद्दल इंग्लंडला आयसीसीने दंड ठोठावला आहे. त्यांच्या विजयाच्या गुणातून दोन गुण वजा करण्यात आले आहेत. त्यामुळे इंग्लंडची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) गुणतालिकेत दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलिया सलग तीन विजयांच्या १०० टक्क्सांह गुणतालिकेत तूर्तास अग्रस्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका (६६.६७ टक्के) आहे. इंग्लंडच्या खात्यात ३ सामन्यांतील २ विजयांचे ६१.११ टक्के आहेत. भारत ३ सामन्यांतील १ विजयासह ३३.३३ टक्क्यांसह चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडच्या खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातूनही १० टक्के रक्कम कापण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in