सायनाचा सनसनाटी विजय,उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

पी. व्ही. सिंधूनेही दमदार कामिगरीत सातत्य राखताना अंतिम आठ खेळाडूंतील स्थान पक्के केले.
सायनाचा सनसनाटी विजय,उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने गुरुवारी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याशिवाय दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूनेही दमदार कामिगरीत सातत्य राखताना अंतिम आठ खेळाडूंतील स्थान पक्के केले.

महिला एकेरीत बिगरमानांकित ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने चीनच्या पाचव्या मानांकित ही बिंग जिआओ हिच्यावर २१-१९, ११-२१, २१-१७ अशी तीन गेममध्ये सरशी साधली. सायनाची पुढील फेरीत जपानच्या आया ओहोरीशी गाठ पडेल. ५०० सुपर दर्जाच्या फेरीत सायनाने तब्बल अडीच वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला. गतवर्षी सायनाने ओरलीन्स मास्टर स्पर्धेत (सुपर १०० दर्जा) उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. दुसरीकडे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या मानांकित सिंधूने व्हिएतनामच्या थू लि निगुएनवर १९-२१, २१-१९, २१-१८ अशी पिछाडीवरून मात केली. शुक्रवारी सिंधूसमोर चीनच्या हॅन यूचे आव्हान असेल. अन्य लढतीत अश्मिता छलिहाला पराभव पत्करावा लागला.

पुरुष एकेरीत एस. एस. प्रणॉयने चायनीज तैपईच्या तिसऱ्या मानांकित चो टिन चेनला १४-२१, २२-२०, २१-१८ असे नमवले. १ तास, १८ मिनिटांत हा सामना जिंकणाऱ्या प्रणॉयचा उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या कोडाई नारोकाशी मुकाबला होईल. मिथुन मंजुनाथला मात्र स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in